News Flash

देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही : नरवणे

देशाच्या सीमा जेव्हा सुरक्षित असतील तेव्हाच देश प्रगती करेल.

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे लष्कर प्रमुख मनोज मुंकुंद नरवणे यांनी नॅशनल वॉर मेमोरिअलला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी सर्वप्रथम शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसंच यादरम्यान त्यांनी देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी मानवाधिकारांच्या रक्षणासाठी विशेष काम करणार असून देशाच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचं म्हटलं.

देशाच्या सीमा जेव्हा सुरक्षित असतील तेव्हाच देश प्रगती करेल. सैन्यदलाचे जवान हे देश सुरक्षित ठेवतील. आम्ही देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. लष्कर, नौदल आणि हवाईदल देशाच्या सुरक्षेसाठी तयार आहेत. आम्ही मानवाधिकारांच्या रक्षणासाठीही विशेष काम करणार आहोत, असंही नरवणे यावेळी म्हणाले. लष्करी कारवाईसाठी सदैव तत्पर राहणं हे आमचं प्राधान्य असेल. आम्ही आमची क्षमता अधिक वाढवणार आहोत आणि पूर्वोत्तर क्षेत्रात आम्ही व्यापक काम करू असंही त्यांनी सांगितलं.

माझी जबाबदारी अधिक योग्यरित्या पेलता यावी यासाठी सक्ती आणि साहस देण्याची मी देवाकडे प्रार्थना करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मंगळवारी भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे. मनोज नरवणे देशाचे २८ वे लष्करप्रमुख ठरले आहेत. जनरल बिपिन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आली असून मंगळवारी ते लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त झाले आहेत. जनरल बिपिन रावत यांच्या जागी लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. लेफ्टनंट जनरल नरवणे यांनी लष्करात ३७ वर्ष सेवा बजावली असून, विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.

कोण आहेत मनोज मुकुंद नरवणे ?
नरवणे हे मूळचे पुण्याचे. त्यांचे शालेय आणि प्रारंभीचे लष्करी शिक्षण पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून १९८० मध्ये लष्करात दाखल झाले. शीख लाईट इन्फ्रंट्रीमधून त्यांच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लष्कराच्या विविध विभागांत पुढे त्यांना काम करण्याची संधी मिळाली. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महुस्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. दहशतवाद, फुटीरतावाद विरोधातील कारवायांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले. परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. खडतर लष्करी सेवेत रमलेल्या नरवणे यांना बागकामाचीदेखील आवड आहे. लष्करी हद्दीत उद्यान, वाहतूक बेटांच्या सौंदर्याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाते. योगासने हा त्यांच्या दिनक्रमातील महत्त्वाचा भाग. लष्करी सेवेत त्यांनी ही आवड जोपासली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 10:58 am

Web Title: army chief manoj mukund narvane speaks they are rady to face any situation jud 87
Next Stories
1 सत्तेत असणाऱ्या सरकारच्या आदेशानुसार काम करावं लागतं – बिपिन रावत
2 नौशेरा सेक्टरमध्ये दशतवाद्यांचा गोळीबार दोन जवान शहीद
3 “अगला स्टेशन सुप्रीम कोर्ट…”, ‘या’ मेट्रो स्थानकाला मिळणार सुप्रीम कोर्टाचं नाव
Just Now!
X