गलवानमध्ये चिनी लष्कराने केलेल्या हिंसक चकमकीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर तेथील भारतीय कमांडर्सशी चर्चा करण्यासाठी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे हे मंगळवारी दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर रवाना होत आहेत. भारताच्या सीमेवरील लष्करी सज्जतेचा ते आढावा घेतील असे लष्करी सूत्रांनी सांगितले.

१५ जून रोजी सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत वीस भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारत व चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी या वेळी खिळे लावलेल्या काठय़ा व इतर शस्त्रांनी हल्ला केला होता. लष्करप्रमुख नरवणे हे सीमेवरील भागात असलेल्या छावण्यांना भेट देणार आहेत. तेथील जवानांशी ते प्रत्यक्ष बोलणार आहेत.

गेल्या आठवडय़ात हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी लडाख व श्रीनगरला भेट देऊन भारतीय हवाई दलाच्या सज्जतेचा आढावा घेतला होता. चीनने कुठलीही आगळीक केल्यास त्याला सडेतोड उत्तर देण्यास सज्ज असल्याचे त्यांनी अलीकडे म्हटले होते.

लष्कराच्या कमांडर्सच्या दोन दिवसांच्या परिषदेनंतर लष्करप्रमुख नरवणे हे लेहला रवाना होत असून या परिषदेत पूर्व लडाखमधील परिस्थितीवर सोमवारी चर्चा झाली होती. लेह येथे जनरल नरवणे हे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांच्याशी चर्चा करतील. चीनच्या सीमेवरील संवेदनशील सीमेवर १४ व्या कोअरचे नेतृत्व हरिंदर सिंग ते करीत आहेत. सोमवारी लेफ्टनंट जनरल सिंग यांनी तिबेट लष्करी जिल्ह्य़ाचे कमांडर मेजर जनरल लिउ लिन यांच्याशी अकरा तास चर्चा केली होती.

गलवानमध्ये चीनने केलेला हल्ला हा पूर्वनियोजित होता असे हिरदर सिंग यांनी चीनच्या अधिकाऱ्यास सांगितले. चीनने पूर्व लडाखमधील सर्व संघर्षांच्या ठिकाणाहून सैन्य मागे घ्यावे असा इशारा चीनला देण्यात आला आहे.

पँगॉग त्सो परिसरातून दोन्ही सैन्यांनी माघारीस सुरुवात करावी यावर चर्चा झाली. गेले सहा आठवडे दोन्ही देशांच्या लष्करात संघर्ष सुरू आहे. ६ जूनला लेफ्टनंट जनरल पातळीवरची पहिली चर्चा झाली होती, त्या वेळी दोन्ही देशांनी सैन्य हळूहळू माघारी घेण्याचे मान्य केले होते. पण नंतर गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांनी १५ जूनला  हिंसाचार केला.

भारत व चीन या दोन्ही देशातील सीमा ही ३५०० कि.मी लांबीची आहे. रविवारी सरकारने भारतीय सैन्यास चीनला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सडेतोड उत्तर देण्याचे स्वातंत्र्य दिले होते.

भारताचा दावा चुकीचा – चीन

चीनचे किती सैनिक ठार झाले याबाबत चीनने पाळलेले मौन अखेर मंगळवारी सोडले. चीनचे ४०हून अधिक सैनिक ठार झाल्याचे वृत्त ही चुकीचे असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी हे वृत्त धादांत खोटे आहे, असल्याचे जबाबदारीने सांगितले.

दहशतवाद्यांशी लढताना सोलापूरचा जवान हुतात्मा

सोलापूर : जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान सुनील दत्तात्रेय काळे (वय ४१) हे मंगळवारी पहाटे हुतात्मा झाले आहेत. काळे हे सोलापूर जिल्ह्यच्या बार्शी तालुक्यातील पानगावचे रहिवाशी आहेत. ही वार्ता सकाळी पानगावसह परिसरात येताच तेथे दुखवटा पसरला आणि स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला. काळे यांची आणखी काही महिनेच सेवा राहिली होती. त्यांनी ही सेवा वाढवून घेतली होती. काश्मीरमधून त्यांची बदली दिल्लीत झाली होती. दरम्यान, त्यांना एक महिना रजाही मिळाली होती. परंतु टाळेबंदीमुळे त्यांना दिल्लीला तसेच गावीही जाता आले नव्हते. त्यांच्या आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.