काश्मिरातील केरान भागातील शालाभट गावामध्ये दहशतवादी घुसल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचा खुलासा लष्करातर्फे बुधवारी करण्यात आला. नियंत्रण रेषेजवळील या गावामध्ये पाकिस्तानातून दहशतवादी घुसले असून, त्यांना हुसकावून लावण्यासाठी लष्कराच्या जवानांकडून गोळीबार करण्यात येत असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये दिसल्यावर लष्कराने हा खुलासा केला.
केरान भागात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करण्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा प्रयत्न गेल्या आठवड्यात लष्कराने उधळून लावला. नियंत्रण रेषेजवळ या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे लष्कराने सोमवारी सांगितले होते. त्यानंतर नियंत्रण रेषेजवळील गावात दहशतवादी आणि जवानांमध्ये धुमश्चक्री सुरू असल्याचे वृत्त निराधार असल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.