20 July 2019

News Flash

चीन सीमेवर पन्नास हजारांचे अतिरिक्त सैन्य

भारताच्या संरक्षण सिद्धतेसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त कुमक तैनात करण्याच्या लष्कराच्या प्रस्तावास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.

| November 20, 2013 12:43 pm

भारताच्या संरक्षण सिद्धतेसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त कुमक तैनात करण्याच्या लष्कराच्या प्रस्तावास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता चीनच्या सीमेनजीक, पन्नास हजार जवानांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ६५ हजार कोटी रुपयांचा भार सरकारी तिजोरीवर पडेल. नव्याने स्थापन करण्यात आलेली १७ कॉर्पस् आणि १४ कॉर्पस् या दोन तुकडय़ा प्रथम चीनच्या सीमेकडे धाडल्या जाणार आहेत.
सध्या या दोन्ही तुकडय़ा झारखंडमधील रांची येथे असून आवश्यक त्या पायाभूत सुविधांची सोय झाली की त्या प. बंगालकडील पनागढ या चिनी सीमेला लागून असलेल्या भागाकडे कूच करतील. यासाठी आवश्यक असलेल्या परवान्यांची पूर्तता नुकतीच करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने, अतिरिक्त कुमक तैनात करण्यास परवानगी देणारे शासकीय मंजुरी पत्रक लष्कराकडे सुपूर्द केले. तसेच त्यासाठी काही नव्या तुकडय़ांची उभारणी करण्यास आणि आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यास अनुमती दिली.
निवडप्रक्रियेस सुरुवात
या नव्या निर्णयामुळे शासकीय तिजोरीवर ६५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे, पण सुरक्षिततेच्या कारणासाठी हा खर्च अनिवार्य असल्याचे सामरिक तज्ज्ञांचे मत आहे. या नव्या तुकडय़ांसाठी अधिकाऱ्यांची निवडप्रक्रिया सुरू झाली असून त्या तुकडय़ांच्या प्रमुखाची निवड ‘मेजर जनरल’ म्हणून नव्याने बढती दिलेल्या अधिकाऱ्यांना पसंती दिली जाणार असल्याचे, लष्करी सूत्रांनी स्पष्ट केले.
हवाई दलाचेही सहकार्य
भारतीय हवाई दलानेही या संरक्षण सिद्धतेसाठी आपला हात पुढे केला आहे. त्यादृष्टीने, पनागढ येथे विशेष मोहिमांसाठी वापरण्यात येणारी सी-१३० जे सुपर हक्र्युलस ही सहा विमाने तसेच हवेतल्या हवेत इंधन भरणा करू शकणारे सहा ‘टँकर्स’ हवाई दलातर्फे तैनात करण्यात येणार आहेत.

First Published on November 20, 2013 12:43 pm

Web Title: army gets final nod to deploy 50000 more troops along china border