जम्मू-काश्मीरच्या कारगिल जिल्ह्य़ातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटातील ५१ विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या विशेष शिष्यवृत्ती योजनेंतर्गत देशातील विविध विद्यापीठांमध्ये नि:शुल्क प्रवेश मिळवून देण्यात लष्कराने मदत केली आहे.
स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत व्हावी याकरिता यावर्षी लष्कराने कारगिल जिल्ह्य़ातील ५१ विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवून दिला, असे लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
होतकरू विद्यार्थ्यांना शोधून लष्कराने त्यांची ऑनलाइन नोंदणी केली. आता समुपदेशानंतर त्यांना निवडक विद्यापीठांमध्ये विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पाठवले जाईल, असेही हा अधिकारी म्हणाला.