झोपेत असलेल्या सहकाऱ्यांवर बेछूट गोळीबार करून पाच जणांची हत्या करणाऱ्या जवानाने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी गंदेरबाल जिल्ह्य़ात उघडकीस आला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.काश्मीरच्या गंदेरबाल जिल्ह्य़ातील साफापोरा भागात तेराव्या राष्ट्रीय रायफल तुकडीची छावणी आहे. या तुकडीच्या एका जवानाने गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास छावणीत झोपलेल्या आपल्या सहकाऱ्यांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला, तर अन्य जवान जखमी झाले. या गोळीबारानंतर आरोपी जवानाने स्वत:वरही गोळी झाडली. या जवानाचाही मृत्यू झाल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून चौकशीचे आदेश देण्यात आल्याचेही या प्रवक्त्याने सांगितले.