भारतीय लष्कराला महत्वपूर्ण यश मिळाले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेला शेवटचा हल्लेखोर सज्जाद भटला सोमवारी संध्याकाळी सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले. सज्जाद जैश-ए-मोहम्मदचा कमांडर होता. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या काश्मीर खोऱ्यातील सर्व दहशतवाद्यांचा लष्कराने खात्मा केला आहे.

१४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यातील बसला धडकवण्यात आलेल्या गाडीचा मालक सज्जाद भट होता. त्यानेच आपली गाडी उपलब्ध करुन दिली होती. बीजबिहारा तालुक्यातील मारहामा गावात झालेल्या चकमकीत सुरक्षा पथकांनी सज्जादला ठार केले. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवस आधी तो जैश-ए-मोहम्मदमध्ये सहभागी झाला होता.

पुलवामामधील आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएच्या तपासातून  हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या मारुती इको कारचा मालक सज्जाद भट असल्याचे समोर आले होते. सज्जाद दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मारहामा गावचा रहिवासी होता. पुलवामा हल्ल्यानंतर सज्जाद फरार झाला होता.
२५ फेब्रुवारीला हातात एके-४७ घेतल्याचा त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

जैशने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. ‘अफझल गुरु’ या कोड नावाने तो फिदायनी स्कवाडमध्ये सहभागी झाला होता. दहशतवादाच्या मार्गावर जाण्याआधी त्याने मारहामा हायर सेकंडरी स्कूलमधून १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले होते.२३ फेब्रुवारीला एनआयएने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने त्याच्या घरावर छापा मारला. पुलवामा हल्ल्यानंतर जैशचे अनेक दहशतवादी, कमांडर लष्कराच्या कारवाईत मारले गेले आहेत.