हनी ट्रॅपमध्ये ४५ भारतीय जवान अडकल्याचे चौकशीतून समोर आले आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयच्या महिला एजंटने फेसबुकच्या माध्यमांतून जवानांना जाळ्यात अडकवले होते. जैसलमेर लष्करी तळावर सोमवीर सिंग या जवानास जाळ्यात ओढून महत्त्वाची माहिती काढून घेतली होती. २०१६ मध्ये सोमवीर जाळ्यात अडकला. त्यांनतर सोमवीरच्या फ्रेंड लिस्टमधील इतर काही जवानही जाळ्यात आडकल्याचा संशय आहे. प्रशासकीय गोपनीयतेच्या कायद्यानुसार सोमवीरवर गुन्हा दाखल करून शुक्रवारी अटक केली आहे.

आयएसआयच्या महिला एजंटने ‘अनिका चोप्रा’ नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले होते. बनावट फेसबुक खात्याद्वारे भारतीय जवानांशी मैत्री वाढवली. यात हे जवान अडकत गेले. सोमवीरही अनिकाच्या जाळ्यात अडकला. यानंतर तिने सोमवीरच्या फेसबुकवरील फ्रेंड लिस्टमधील इतर जवानांशी मैत्री वाढवली. त्यामुळे या सर्व जवानांची कसून चौकशी सुरू आहे. राजस्थान सीआयडीसह जोधपूरच्या यंत्रणाही ही चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जवानांकडून गुप्त माहिती काढून घेण्यासाठी ‘अनिका चोप्रा’ व्हिडिओ कॉल करून नग्नावस्थेत नृत्य करत असे. हे जवान महत्त्वाच्या विभागांत व लष्करी तळांवर तैनात होते. आतापर्यंत नेमकी कोणती माहिती बाहेर गेली हे आता स्पष्ट होईल. सध्या सोमवीरची कसून चौकशी सुरू आहे. पण व्हॉट्सअपर सोमवीरने संवेदनशिल गुप्त माहिती पाठवल्याचा संशय आहे.