भारतीय सैन्यातील मेजर जनरल पदावरील अधिकाऱ्याविरोधात लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत. एनसीसीच्या मुलींना अश्लील मेसेज पाठवण्यासोबतच आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी देखील त्यांची चौकशी केली जाणार आहे.
गुजरातमधील वडोदरा येथे कार्यरत असताना मेजर जनरल पदावरील अधिकाऱ्याने एनसीसीच्या मुलींना अश्लील मेसेज पाठवले होते. सध्या संबंधित अधिकारी हा दुसऱ्या राज्यात कार्यरत आहे.

लेफ्टनंट जनरल आर एस सलारिया यांच्या अध्यक्षतेखालील समिती या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. यात एनसीसी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचे विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महिला कर्नलचाही समावेश आहे.
एनसीसीमधील मुलींचा ही समिती जबाब घेईल. संबंधित अधिकाऱ्याने मुलींना व्हॉट्स अॅपवर अश्लील मेसेज पाठवले होते. चौकशीत संबंधितांचे मोबाईल फोनही तपासले जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेजर जनरलने हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘माझ्या मोबाईलवरुन दुसऱ्याने हे मेसेज पाठवले’, असे मेजर जनरल यांची म्हटले आहे. संबंधित अधिकाऱ्यावर आर्थिक गैरव्यवहार तसेच कनिष्ठ सहकाऱ्यांना त्रास दिल्याचा आरोपही आहे. या आरोपांची देखील चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणाची लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.