सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुराने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी लष्कर, नौदल, हवाई दल, एनडीआरएफ, पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. याव्यतिरिक्त केरळमध्येही पावसाने थैमान घातलं आहे. एर्नाकुलम, त्रिशूर, पठानमथिट्टा, मलप्पुरम आदी ठिकाणी अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अशातच एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना केरळमधील वायनाडमध्ये घडली. लष्कराच्या मदतीने एका नवजात बालकाची पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका केली.

वायनाडमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका नवजात बालकाची आज (शनिवारी) लष्कराच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. त्यानंतर सर्वांनी लष्कराचे आभार मानले आहेत. केरळमध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत 22 लोकांनी आपले जीव गमावले आहेत. तर 22 हजारांपेक्षा अधिक लोकांना कॅम्पमध्ये हलवण्यात आले आहे. तर दुसरीकडे कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्किंग क्षेत्रात पाणी भरल्याने रविवारी दुपारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तर महाराष्ट्रातही भयाण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेले चार दिवस दक्षिण महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ांना महापुराने घातलेला विळखा शुक्रवारी काहीसा सैल झाला. पुराचे पाणी ओसरू लागले असले तरी समस्यांचा विळखा मात्र आणखी घट्ट झाला आहे. मदतकार्याला वेग आला असला तरी अपुरी यंत्रणा, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, पुनर्वसनाचे प्रश्न बिकट झाले आहेत. कोल्हापुरात पंचगंगेची धोका पातळी ४३ फूट असून ती गुरुवारी ५८ फुटापर्यंत उंचावली होती. त्यामध्ये घट होत शुक्रवारी ती ५२ फुटांवर आली. तर सांगलीत गेल्या २० तासांहून अधिक काळ ५७ फूट ५ इंचावर असलेली कृष्णेची पातळी शुक्रवारी केवळ ३ इंचाने घटली. जिल्ह्य़ात अन्यत्र मात्र पूरपातळी झपाटय़ाने कमी होत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.