‘शांती-प्रक्रियेतील अडथळ्यांना पाकिस्तानी लष्कर जबाबदार’

देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कुठल्याही संकटाचा मुकाबला करण्यास भारतीय लष्कर सज्ज आणि सक्षम असल्याची ग्वाही लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनी बुधवारी दिली. पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यांनंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी हल्ल्यांमागील सूत्रधारांना जशास तसे उत्तर देण्याची आवश्यकता बोलून दाखविली होती. त्या पाश्र्वभूमीवर सुहाग यांनी हे वक्तव्य केले.

लष्करी दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुहाग यांनी पाकिस्तानी लष्करावर थेटच निशाणा साधला. या हल्ल्यामुळे येत्या आठवडय़ात होणाऱ्या दोन्हीही देशांच्या परराष्ट्र सचिवांची बैठक अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडली आहे. याबद्दल सुहाग यांना प्रश्न  विचारला असता ते म्हणाले की, हा राजनैतिक निर्णय आहे. परंतु शांतता प्रक्रियेत खोडा घालण्याचे काम पाकिस्तानी लष्कराने वारंवार केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भारतासोबत चर्चा सुरू करण्याची भूमिका पाकिस्तानी लष्कराला पसंत नसल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी शांतता प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांबद्दल पाकिस्तानी लष्कराला जबाबदार धरले.

पंजाबलगतच्या सरहद्दीवरून होणाऱ्या घुसखोरीबद्दल चिंता व्यक्त करत सुहाग यांनी या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाची असल्याचे सांगितले. पठाणकोट तळावर हल्ला करणारे सहाही अतिरेकी अगोदरपासूनच तिथे लपून बसले असावेत, असा तर्क मांडताना त्यांनी हल्ल्यांनंतर या तळाभोवतीच्या २४ किमी परिसराची लष्कराने नाकाबंदी केल्यानंतर कुणीही आतमध्ये दाखल होऊ शकले नाही, या वस्तुस्थितीकडेही लक्ष वेधले. दहशतवाद्यांना जर स्थानिकांनी मदत केली असेल, तर तो देशद्रोह ठरतो, असे मत व्यक्त करत सुहाग यांनी हल्ल्याला उत्तर देतेवेळी सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप फेटाळून लावला.