देशासमोरील सुरक्षेचे आव्हान दिवसेंदिवस जटील होत असताना पठाणकोट हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिल्याचे सांगत लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी लष्कराच्या कारवाईचे कौतुक केले.
नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दलबीरसिंग यांनी पठाणकोट हल्ल्याशी निगडीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. देशाची सुरक्षा ही भारतीय लष्कराची सर्वोच्च प्रेरणा असून, राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱयांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याची भारतीय लष्कराची तयारी असल्याचा विश्वास दलबीरसिंग यांनी यावेळी व्यक्त केला. पठाणकोट ऑपरेशन लष्कराने योग्य पद्धतीने पार पाडले. जीवीतहानी टाळण्याच्या उद्देशामुळे ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागला, असेही दलबीर म्हणाले.
पठाणकोट ऑपरेशन राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) हाती सोपविण्याच्या निर्णयाचे दलबीरसिंग यांनी समर्थन केले. दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलीस ठेवल्याच्या घटनांना एनएसजीचे जवान उत्तम प्रकारे हाताळू शकतात. त्यामुळे हे ऑपरेशन एनएसजीच्या हाती सोपविण्याच्या निर्णय योग्यच होता, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) पठाणकोट हल्ल्याचा तपास करत असून, काही पाकिस्तानी हत्यारे ताब्यात घेण्यात आली आहेत, तपास पूर्ण झाल्यानंतर एनआयएकडून आणखी स्पष्ट दिली जाणार असल्याचे दलबीरसिंग यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2016 3:26 pm