सेवा निवड मंडळामार्फत लष्करात भरतीतील कथित भ्रष्टाचाराबद्दल केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लेफ्टनंट कर्नल दर्जाचे ५ अधिकारी, १२ इतर कर्मचारी आणि ६ नागरिक यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
या प्रकरणाच्या संबंधात सीबीआयने दिल्ली लष्करी छावणीतील बेस हॉस्पिटलसह देशभरातील १३ शहरांमध्ये पसरलेल्या ३० ठिकाणांवर छापे घातले, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
कपूरथळा, भटिंडा, दिल्ली, कैथल, पलवाल, लखनऊ, बरेली, गोरखपूर, विशाखापट्टणम, जयपूर, गुवाहाटी, जोरहाट आणि चिरांगन या ठिकाणी हे छापे घालण्यात आले. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये या भरती रॅकेटचे कथित सूत्रधार आर्मी एअर डिफेन्स कॉप्र्सचे लेफ्टनंट कर्नल भगवान यांचा समावेश असल्याचेही हे अधिकारी म्हणाले.
सध्या रजेवर असलेले ले.क. भगवान आणि नायब सुबेदार कुलदीप सिंग यांचा एसएसबी केंद्रांवरील संभाव्य अधिकारी उमेदवारांकडून लाच घेण्यात सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले होते.
आरोप काय?
लष्कर भरतीच्या प्रक्रियेत नवी दिल्लीत बेस हॉस्पिटलमध्ये ज्या अधिकारी- उमेदवारांना तात्पुरते नाकारण्यात आले आहे, त्यांची फेर वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण करून देण्यासाठी लाच स्वीकारण्यात लष्कराचे काही विद्यमान अधिकारी अडकले असल्याची माहिती मिळाली असल्याची तक्रार ब्रिगेडिअर (दक्षता) व्ही.के. पुरोहित यांनी केली होती. तिच्या आधारे सीबीआयने ही कारवाई केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2021 1:00 am