जम्मू-काश्मीर पिपल्स मुव्हमेंटची नेता आणि जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्षा शेहला रशीद हिने रविवारी(दि.18) काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचा दावा केला होता. काश्मीरमधील परिस्थितीबाबत एकामागोमाग 10 ट्विट करुन शेहला रशीदने काश्मीर खोऱ्यात लष्कराकडून सामान्यांवर अत्याचार सुरू असल्याचा आरोप केला होता.

भारतीय लष्कराकडून शेहलाच्या आरोपांवर उत्तर देण्यात आलं असून, सर्व आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन असल्याचं लष्कराने म्हटलं आहे. हिंसा भडकविण्यासाठी अशा प्रकारच्या खोट्या बातम्या विरोधकांकडून पसरवल्या जात आहेत, असं लष्कराने नमूद केलं आहे.

काय केले होते आरोप – लष्कराचे जवान रात्रीतून नागरिकांच्या घरात घुसून तरुणांना उचलून घेऊन जातायेत, घरांमध्ये तोडफोड केली जात आहे. पोलिसांकडे कोणतेही अधिकार नसून केवळ लष्कराचा मनमानी कारभार सुरू आहे. एका एसएचओ दर्जाच्या अधिकाऱ्याची केवळ सीआरपीएफच्या जवानाने तक्रार केली म्हणून बदली करण्यात आली. शोपियांच्या लष्करी तळामध्ये चार जणांना घेऊन गेले आणि त्यांना चौकशीच्या नावाखाली टॉर्चर करण्यात आलं. त्यांच्याजवळ एक माइक ठेवण्यात आला, जेणेकरुन सर्व परिसरात त्यांच्या किंकाळ्या ऐकायला जाव्यात आणि दहशत पसरावी, परिणामी सर्वत्र दहशतीचं वातावरण आहे. अशाप्रकारचे अनेक गंभीर आरोप शेहला रशीदने केले आहेत.

दरम्यान, भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारविरोधात गैरसमज निर्माण होईल अशा फेक न्यूज पसरवल्याप्रकरणी शेहला रशीद विरोधात सुप्रीम कोर्टातील वकील अलख अलोक श्रीवास्तव यांनी फौजदारी तक्रार दाखल केली आहे. तसेच याप्रकरणी तिच्या अटकेचीही मागणी केली आहे.