केरळमध्ये महापुराने थैमान घातलं असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. एनडीआरएफ, लष्कर, नौसेना, हवाई दलासहित इतरही जवान आणि स्वयंसेवक दिवसरात्र बचावकार्य करत असून लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. सोशल मीडियावर रोजच केरळमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले जात असून जवानांचं कौतूक केलं जात आहे. प्रत्येकजण बचावकार्य आणि नैसर्गिक आपत्तीबद्दल चर्चा करत आहे. मात्र यादरम्यान काहीजण खोटे फोटो शेअर करतानाही आढळत आहेत. असाच एक भारतीय लष्कर जवानाचा उभं राहून जेवतानाचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोत जवान केळीच्या पानावर जेवताना दिसत आहे. जेवताना त्यांना बसायलाही जागा नसून आहे त्या जागीच उभं राहून जेवताना दिसत आहे. तेलगू वृत्तावाहिनीच्या पत्रकाराने हा फोटो शेअर केला असून, बसायलाही वेळ नाही आणि तक्रारही नाही अशी कॅप्शन दिली आहे.

मात्र या व्हायरल फोटोची तपासणी केली असता हा फोटो खोटा असल्याचं समोर आलं आहे. भारतीय लष्करानेच हा फोटो खोटा असल्याची माहिती दिली आहे. या फोटोतील जवानाचा गणवेश पाहिलात तर हा अजिबात भारतीय लष्करासारखा नसल्याचं तुमच्या लक्षात येईल. सोबतच भारतीय जवान कधीच केळीच्या पानावर जेवत नाहीत. ते नेहमी आपलं सामान सोबत ठेवत असतात.

याआधीही सोशल मीडियावर एक बनावट व्हिडीओ व्हायरल झाला होता. केरळमधील लष्कराच्या बचाव आणि मदत कार्याला केरळ सरकारकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोप एका लष्करी गणवेश घातलेल्या व्यक्तीकडून व्हिडीओद्वारे करण्यात आला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. मात्र, हा व्हिडीओ बनावट असून तो कोणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे पाठवू नये, असे आवाहन खुद्द लष्कराकडून करण्यात आले होते.