पाकिस्तानसोबत भारताला शांततापूर्ण संबंध हवे आहेत. पण तरीही पाकिस्तानच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीत त्यामुळे आता त्यांच्याकडून एक गोळी आली तर तर त्या गोळीला असंख्य गोळ्यांनी उत्तर देऊ असा इशाराच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. लष्कराला तसे आदेश दिल्याचेच राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्रिपुरा या ठिकाणी झालेल्या आगरताळा भागात झालेल्या सभेत ते बोलत होते.

पाकिस्तान वारंवार भारताच्या कुरापती काढतो आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो आहे पण आता सहनशक्तीची हद्द झाली. पाकिस्तानच्या सीमेवरून एक गोळी जरी भारताच्या दिशेने आली तर असंख्य गोळ्या झाडून त्यांना प्रत्युत्तर द्या असे आदेशच मी लष्कराला दिल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

शेजारी राष्ट्र म्हणून हल्ला करण्याची सुरूवात भारताकडून होणार नाही. पण पाकिस्तानच्या कुरापती थांबल्या नाहीत तर त्यांना त्याची किंमत मोजावीच लागेल. पाकिस्तानकडून सीमा भागात असो किंवा जम्मू काश्मीरमध्ये असो गोळीबार, शस्त्रसंधीचे उल्लंघन किंवा अतिरेकी कारवाया सुरु असतात या सगळ्या थांबल्या नाहीत तर आता गप्प बसून हे सगळे सहन केले जाणार नाही असेही राजनाथ यांनी म्हटले आहे. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

काश्मीर प्रश्नी पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाहीत ते काश्मीरवर कब्जा करण्याच्या वल्गना करतात मात्र काश्मीर भारताचेच आहे आणि भारताचेच राहिल. भारताकडून काश्मीर हिरावून घेण्याची हिंमत पाकिस्तानमध्ये नाही असेही सिंह यांनी म्हटले आहे. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी यूपीए सरकारवरही टीका केली. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबाबत मी काही बोलणार नाही. मात्र त्यांच्या कार्यकाळात यूपीए सरकारवर ४ लाख कोटी रुपयांचे घोटाळे झाले हे सत्य नाकारताही येणार नाही.

त्रिपुराच्या जनतेला सुशासन हवे असेल तर त्यांनी भाजपाला निवडून द्यावे असेही आवाहन राजनाथ सिंह यांनी केले. आम्ही १९ राज्यांमध्ये विजय मिळवला आहे, या १९ राज्यांधमध्ये कसा विकास होतो आहे ते पाहा असे आवाहनही राजनाथ यांनी केले. डाव्यांची सत्ता उलथवून टाकून त्रिपुराची जनता भाजपाला मत देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.