लेफ्टनंट उमर फयाझ यांचे अपहरण करुन हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने जवळपास ११ महिन्यांनी कंठस्नान घातले. द्रगडमधील चकमकीत खात्मा झालेले २ दहशतवादी उमर फयाझच्या हत्येत सहभागी होते, अशी माहिती जम्मू- काश्मीरचे पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी दिली.

सैन्याच्या राजपूताना रायफल्समधील लेफ्टनंट उमर फयाझ यांची मे २०१७ मध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली होती. दहशतवाद्यांनी उमर फयाझ यांचे कुलगाममधील राहत्या घरातूवन अपहरण केले. उमर घरात आहे का अशी विचारणा करत दहशतवादी घरात घुसले आणि मग त्यांनी फयाझ यांचे अपहरण केले. यानंतर फयाझ यांना निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आला. सैन्यात भरती झाल्यावर पहिल्यांदाच फयाझ रजा घेऊन घरी आले होते. या घटनेनंतर दहशतवाद्यांविरोधात रोष निर्माण झाला होता.

लेफ्टनंट फयाझ यांच्या मृत्यूला ११ महिने पूर्ण होत असतानाच भारतीय सुरक्षा दलांनी फयाझ यांच्या हत्येत सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. द्रगडमधील चकमकीत एकूण सात दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. यातील दोन दहशतवादी हे उमर फयाझ यांच्या हत्येत सहभागी होते, अशी माहिती पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी दिली. सातही दहशतवादी हे स्थानिक असून त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. द्रगड व काचदोरा येथील चकमकीत दोन नागरिकांचा ही मृत्यू झाला असून एकूम २५ स्थानिक यात जखमी झाले, अशी माहिती त्यांनी दिली. शोपियान जिल्ह्यातील चकमकीत दोन जवानही शहीद झाले.

अनंतनागमधील एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले. तर एका दहशतवाद्याचा चकमकीत मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या दहशतवाद्यानेही समर्पण करावे, यासाठी पोलिसांनी अथक प्रयत्न केले. त्याच्या कुटुंबीयांचीही मदत घेण्यात आली. मात्र, त्याने शरण येण्यास नकार दिला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

२२ वर्षीय लेफ्टनंट उमर फयाज यांच्या हत्येमागे हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असावा, अशी शक्यता वर्तवली जात होती, अनंतनागमधील चकमकीत मारला गेलेला दहशतवादी देखील हिज्बुलचाच होता, अशी माहिती समोर आली आहे.