जम्मू : २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्ष्यभेदी हल्ले करण्यात आले, त्यापूर्वी भारतीय फौजांनी नियंत्रण रेषेपलीकडे हल्ले केल्याचे सुचवणारी कुठलीही माहिती आमच्याकडे नाही, असे लष्कराने म्हटले आहे.

मनमोहन सिंह सरकारच्या कार्यकाळात सहा लक्ष्यभेदी हल्ले करण्यात आल्याचा जो दावा यूपीए आणि काँग्रेसने केला होता, त्याला लष्करी मोहिमा महासंचालकांच्या (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स- डीजीएमओ) या निवेदनामुळे छेद गेला आहे.

२००४ ते २०१४ या कालावधीत आणि सप्टेंबर २०१४ नंतर पाकिस्तानात किती लक्ष्यभेदी हल्ले करण्यात आलेले, अशी विचारणा जम्मू येथील रोहित चौधरी यांनी माहितीचा अधिकार कायद्यान्वये केली होती. यापैकी किती यशस्वी झाले, असेही त्यांनी विचारले होते.

२९ सप्टेंबर २०१६ पूर्वी झालेल्या लक्ष्यभेदी हल्ल्यांशी संबंधित कुठलीही माहिती आमच्याकडे नाही, असे संरक्षण मंत्रालयाच्या (लष्कर) एकीकृत मुख्यालयातील लेफ्टनंट कर्नल एडीएस जसरोटिया यांनी सांगितले.

भारतीय लष्कराने २९ सप्टेंबर २०१६ रोजी नियंत्रण रेषेपलीकडे लक्ष्यभेदी हल्ला केला. यात कुठल्याही भारतीय जवानाची जीवहानी झाली नाही, असे उत्तर डीजीएमओच्या या अधिकाऱ्याने चौधरी यांनी केलेल्या विचारणेला दिले.

यूपीएच्या कार्यकाळात लष्कराने अनेक लक्ष्यभेदी हल्ले केल्याचा दावा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांनी केला होता. भारतविरोधी ताकदींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही हे हल्ले केले, मात्र मते गोळा करण्यासाठी त्यांचा वापर केला नाही, असे सिंग यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. तर, मनमोहनसिंग सरकारच्या काळात सहा लक्ष्यभेदी हल्ले करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी गेल्या आठवडय़ात अ.भा. काँग्रेस समितीच्या पत्रकार परिषदेत दिली होती.

भाजपने या दाव्यावर प्रश्नचिन्ह लावताना, काँग्रेसला खोटे बोलण्याची सवय असल्याचे म्हटले होते. माजी लष्करप्रमुख असलेले केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी आपल्या कार्यकाळात असे काही लक्ष्यभेदी हल्ले झाल्याचे नाकारताना, काँग्रेस या विषयावर खोटे बोलत असल्याचा आरोप केला होता.