जम्मू-काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांकडून भारतीय जवानाच्या मृतदेहाच्या करण्यात आलेल्या विटंबनेविषयी देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनीदेखील या कृत्याचा निषेध केला असून यापेक्षा भयानक कृत्य असू शकत नाही, असे म्हटले आहे. तसेच जवानांचे मानवी हक्क हे इतर कोणाच्याही मानवी हक्कांपेक्षा महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या कृत्यांमुळे पाक अगोदरच उघडा पडला आहे. परंतु, त्यांच्याकडून हे नाकारले जात आहे. मात्र, भारतीय सैन्य या सगळ्याला चोख प्रत्युत्तर देईल, असा ठाम विश्वास जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमारेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. कालच्या माछिल सेक्टरमधील आणखी एका चकमकीदरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचाही प्रकार समोर आला आहे. या चकमकीत एक दहशतवादीही मारला गेला होता. मात्र, पाकच्या या आगळिकीला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशा इशारा भारतीय सैन्याने दिला आहे. माछिल सेक्टरमधील या चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पलायन करण्यापूर्वी भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली होती. यावेळी पाक सैन्याकडून दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी कव्हरिंग फायर सुरू होती, अशी माहिती भारतीय सैन्याच्या उधमपूर येथील मुख्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. या कृत्यावरून सीमेपल्याड अधिकृत आणि अनधिकृत रानटी टोळ्या असल्याचे सिद्ध होते, असेही भारतीय सैन्याने म्हटले आहे. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान पूर्णपणे बिथरला आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाककडून सीमेवर आतापर्यंत ५३ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.