लेह/श्रीनगर : पाकिस्तान जोपर्यंत घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत भारतीय लष्कर सडेतोड जबाब देत राहील, असा निर्धार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केला.
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही, भारतीय लष्कर पाकिस्तानात शिरून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करील, असा इशारा दिला.

भारतील लष्कराने सीमेपलिकडे नियंत्रण रेषेजवळ केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे सहा ते १० लष्करी अधिकारी ठार झाल्याचे आणि तीन दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी शनिवारी दिली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राजनाथ आणि मलिक यांनी पाकिस्तानला सज्जड इशारा दिला. पूर्व लडाखमधील श्योक नदीवर बांधलेल्या १४०० फूट उंचीच्या कर्नल चेवांग रिनचेन पुलाच्या लेहमधील उद्घाटन कार्यक्रमात राजनाथ बोलत होते. भारताने कधीही प्रथम गोळीबार केला नाही. असे असतानाही पाकिस्तान आगळीक करीत असून त्याला भारतीय लष्कर सडेतोड जबाब देत आहे, असेही राजनाथ म्हणाले.

श्रीनगरमधील एका कार्यक्रमाच्या वेळी राज्यपाल मलिक म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबविल्या नाहीत तर भारत पाकिस्तानच्या हद्दीत शिरून त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करील. त्यामुळे पाकिस्तानने वर्तणूक सुधारावी.

दहशतवादी कारवायांना मदत करून शेजारी देश भारताला अस्थिर आणि कमकुवत करण्याचा, त्याचबरोबर आमच्या एकात्मतेला हात लावण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच भारतीय लष्कराने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. – राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री