पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी केलेल्या भागातून चिनी सैन्य अजूनही पूर्णपणे मागे हटलेलं नाही. एप्रिलच्या मध्यापर्यंत जी स्थिती होती, तशी ‘जैसे थे’ परिस्थिती कायम करण्याची पीपल्स लिबरेशन आर्मीची मानसिकता दिसत नाहीय. त्यामुळे हा संघर्ष दीर्घकाळ, हिवाळ्यापर्यंत खेचला जाऊ शकतो. हिवाळयात इथे कडाक्याची थंडी असते. त्या वातावरणात इथे सैन्याची तैनाती करताना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्या दृष्टीने भारतीय सैन्याने आतापासूनच तयारी सुरु केली आहे.

लडाखमध्ये १,५९७ किलोमीटरची सीमारेषा चीनला लागून आहे. भारतीय लष्कराने अमेरिका, रशिया आणि युरोपियन दुतावासातील आपल्या रक्षा सहकाऱ्यांना उबदार कपडे, बर्फातील तंबुचे उत्पादन करणाऱ्यांना कंपन्यांसंदर्भात माहिती जमवून ठेवायला सांगितली आहे. इमर्जन्सीमध्ये गरज पडल्यास खरेदी करण्यासाठी ही तयारी आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

१९८४ साली सियाचीनमध्ये ऑपरेशन मेघदूत नंतर पश्चिम क्षेत्रामध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्याला स्थानिक उत्पादकांकडूनच सर्व आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यात आला होता. यामध्ये इग्लू, डोम्स, डाऊनपार्क, बर्फातील गॉग्लस, बूट, ग्लोव्हजचा समावेश होता.

सियाचीन एक उंचावरील युद्धक्षेत्र असून तिथे तैनात असलेल्या जवानांसाठी खास कपडे, बूट आणि साधनसामुग्रीची आवश्यकता असते. लडाखमध्ये सुद्धा जवान उंचावरील क्षेत्रात तैनात आहेत. तिथे तैनात असलेल्या जवानांसाठी सुद्धा सियाचीन सारखी साधन सामुग्री खरेदी करावी लागणार आहे.

संख्या आणि शस्त्रास्त्रांचा विचार केल्यास भारताने लडाखमध्ये चीनच्या तोडीस तोड सैन्य तैनाती केली आहे. अलीकडेच आणखी ३५ हजार सैनिक तैनात केल्याचे वृत्त कमांडर्सनी फेटाळून लावले. पुढच्यावर्षी चीनने पुन्हा अशी आगळीक करुन नये, यासाठी LAC वर काही भागांमध्ये विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे असे लष्करी कमांडर्सनी स्पष्ट केले.