23 January 2021

News Flash

सैन्याचे ‘ऑपरेशन ऑल आऊट २’; हे टॉप ९ दहशतवादी हिटलिस्टवर

सुरक्षा दलांनी जम्मू- काश्मीरमधील टॉप २१ दहशतवाद्यांची यादीच तयार केली असून आगामी काळात या दहशतवाद्यांना टार्गेट केले जाणार आहे.

संग्रहित छायाचित्र

जम्मू- काश्मीरमध्ये शुक्रवारी सुरक्षा दलांनी आयसिसच्या जम्मू- काश्मीरमधील म्होरक्यासह चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. जम्मू- काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यावरची ही पहिलीच मोठी चकमक होती. केंद्र सरकारने जम्मू- काश्मीरमधील दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली असून आगामी काळात लष्करी कारवाया वाढण्याची चिन्हे आहेत.

सुरक्षा दलांनी जम्मू- काश्मीरमधील टॉप २१ दहशतवाद्यांची यादीच तयार केली असून आगामी काळात या दहशतवाद्यांना टार्गेट केले जाणार आहे. यामध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचे ११, लष्कर – ए- तोयबाचे सात, जैश- ए- मोहम्मदचे दोन आणि अल-कायदाची जम्मूतील संघटना अन्सार गजवत उल हिंद या संघटनेच्या एका दहशतवाद्याचा समावेश आहे. या २१ मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना ए++ श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या दहशतवाद्यांवर १२ लाखांचे इनाम आहे.

हिटलिस्टवरील टॉप ९ दहशतवादी
१. झाकीर मुसा
झाकीर मुसा उर्फ झाकीर राशिद भट हा अल कायदाची जम्मू- काश्मीरमधील संघटना अन्सार गजवत उल हिंदचा प्रमुख आहे. तो अवंतीपोरामधील नुरपोराचा रहिवासी आहे. झाकीर हा पूर्वी हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये होता.

२. डॉक्टर सैफुल्लाह
सैफुल्लाह याला अबू मुसेब या नावाने देखील ओळखले जाते. सैफुल्लाह हा श्रीनगर भागात हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमूख आहे. तो पुलवामा येथील मालंगपोराचा रहिवासी असून तो जखमी दहशतवाद्यांवर उपचार देखील करतो.

३. नावेद जट
नावेद जट उर्फ अबू हंजाला हा पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येनंतर चर्चेत आला आहे. तो पाकिस्तानी असून लष्कर- ए- तोयबा या संघटनेसाठी तो काम करतो.

४. झहूर अहमद
झहूर अहमद हा सिरनू येथील रहिवासी असून २०१७ मध्ये तो दहशतवादी संघटनेत सामील झाला. औरंगबजेब या जवानाच्या हत्येमागे जहूरचा हात असल्याचा संशय आहे. झहूर हा भारतीय सैन्याचा जवान होता. २०१७ मध्ये तो लष्करी कॅम्पमधून एके ४७ घेऊन पळून गेला होता. यानंतर तो हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेत सामील झाला.

५. झुबैर उल इस्लाम
झुबैर हिज्बुजल मुजाहिद्दीनचा काश्मीरमधील कमांडर आहे. तो पुलवामामधील बैगपुरा येथील रहिवासी असून सब्जार अहमद भटच्या मृत्यूनंतर झुबैरकडे काश्मीरची जबाबदारी सोपवण्यात आली. जुबैरला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आघाडीवर असल्याचे समजते.

६. अल्ताफ कचरु उर्फ मोइन उल इस्लाम
अल्ताफ हा हिज्बुल मुजाहिद्दीनचा कुलगाममधील कमांडर आहे. २०१५ नंतर सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यांचा तो मास्टरमाईंड असून तो विज्ञान शाखेतील पदवीर आहेत.

७. झिनत उल इस्लाम उर्फ अलकामा
अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अबू इस्माइलला सुरक्षा दलांनी चकमकीत ठार मारल्यानंतर झिनतला लष्कर- ए- तोयबात कमांडरपदावर बढती देण्यात आली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये शोपियाँ येथे सैन्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता.

८. वासिम अहमद उर्फ ओसामा

वासिम अहमद हा शोपियाँ जिल्ह्यातील लष्कर- ए- तोयबाचा कमांडर असून तो बुरहान वानीच्या गटातील आहे.

९. समीर अहमद सेह
समीर अहमद सेह हा अल बद्र या संघटनेचा दहशतवादी आहे. ही संघटना अफगाणिस्तानमधील दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. १९९८ पासून ही संघटना जम्मूत सक्रीय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 6:59 am

Web Title: armys operation all out 2 in jammu and kashmir 21 top terrorists on hit list
Next Stories
1 आयसिसच्या काश्मीरमधील म्होरक्याचा अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचा कट?
2 ‘आधार’च्या बायोमेट्रिक डेटाचा वापर गुन्ह्यांच्या तपासासाठी करता येणार नाही: UIDAI
3 जिल्हा बँकांत पाच दिवसांत २२ हजार कोटी
Just Now!
X