अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरण भडकण्याची चिन्हं दिसत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित होत असून, विरोधकांकडून याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी प्रकरणावरून भाजपाला धारेवर धरलं आहे. “आपल्या जवानांच्या हौतात्म्याचा वापर टीआरपी आणि निवडणुकीतील फायद्यासाठी करण्यात आला. यासारखं दुर्दैवी दुसरं काहीच असू शकत नाही,” असं म्हणत तेजस्वी यादवांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे.

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियात व्हायरलं झालं. त्यानंतर देशात प्रंचड गदारोळ सुरू झाला आहे. संवेदनशील आणि गोपनिय माहितीची वाच्यता या संवादात करण्यात आलेली असल्यानं विरोधकांकडून याची चौकशी करण्याची मागणीही होत आहे. काँग्रेस या प्रकरणाची संसदेच्या संयुक्त समितीकडून चौकशी करण्याची मागणी केले असून, तेजस्वी यादवांनीही हाच मुद्दा उपस्थित केला आहे.

“ही कसली देशभक्ती आहे, जिथे आपल्या जवानांच्या वीरमरणाचा वापर टीआरपी आणि निवडणुकीच्या फायद्यासाठी वापर करण्यात आला. यासारखी दूर्दैवी निंदनीय गोष्ट कोणतीच असू शकत नाही. देशाला माफीनामा आणि जवानांच्या हौतात्म्याचा सौदा करणाऱ्या देशभक्तीची गरज नाही. पूर्ण प्रकरणाची संसदीय समितीकडून चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली आहे.

काय आहे अर्णब गोस्वामी- दासगुप्ता यांच्यातील संवाद?

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या संवादात पार्थ यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख निष्क्रिय (यूजलेस) असा केला आहे. त्याचबरोबर समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या संवादांत सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, अशा शब्दांत गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे उघड झाले आहे. याशिवाय फेब्रुवारी २०१९मध्ये पुलवामा येथे अतिरेक्यांनी घडविलेल्या आत्मघातकी हल्ल्याबाबत अर्णब यांचे आक्षेपार्ह विधान आढळते. या हल्ल्यात ४० केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले होते. या व्हॉट्सअ‍ॅप संवादात पुलवामा हल्ल्याबाबत अर्णब यांनी केलेल्या विधानाचा समाचार नागरिकांनी ट्वीटरसह अन्य समाजमाध्यमांवरून घेतला.