News Flash

पोलिसांनी मारहाण केल्याची अर्णब गोस्वामींची तक्रार न्यायालयाने फेटाळली; रिमांड सुनावणी सुरू

कोर्टाच्या आवारात फोनवरुन चित्रीकरण केल्याप्रकरणी कोर्टानं फटकारलं

मुंबई पोलिसांनी बुधवारी सकाळी अटकेच्या कारवाईदरम्यान आपल्याला मारहाण केल्याची तक्रार रिपब्लिक भारतचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी न्यायालयात केली होती. मात्र, न्यायालयाने ही तक्रार फेटाळून लावली आहे. तसेच त्यांच्या रिमांडवरील सुनावणी अद्याप सुरु असल्याचे सुत्रांकडून कळते.

अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय चाचणीचे आदेश अलिबागच्या सत्र न्यायालयाने दिले होते. या तपासणीनंतर गोस्वामी यांना न्यायालयात हजर करण्यात आलं दरम्यान त्यांनी पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार केली होती, यावर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने प्रथमदर्शनी पोलिसांकडून मारहाण झाल्याचे दिसत नसल्याचे सांगत न्यायलयाने त्यांची तक्रार फेटाळून लावली.

कोर्टाच्या आवारात मोबाईल चित्रीकरण केल्याप्रकरणी कोर्टानं फटकारलं

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना कोर्ट परिसरात मोबाईलचा वापर केला. त्यांनी मोबाईलवरुन चित्रीकरण करुन कोर्टाच्या सुनावणीचे थेट प्रसारण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृतीसाठी कोर्टाने त्यांना चांगलेच फटकारले. कोर्टाच्या आवारात मोबाईलच्या वापरला सक्तीने बंदी आहे.

गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

रिपब्लिकचा काय दावा?

पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर ‘रिपब्लिक’ने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा आहे.

अर्णब गोस्वांमी यांनी १० पोलीस कर्मचारी घरात घुसले आणि घराबाहेर येण्यासाठी जबरदस्ती करत धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी रिपब्लिकचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी आणि संजय पाठक यांना घरात जाण्यापासून रोखल्याचंही सांगण्यात आलं आहे. अटकेची कारवाई करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांच्या घराबाहेर पोलिसांची ८ वाहनं आणि ४० ते ५० कर्मचारी उपस्थित होते असा दावा आहे. निरंजन यांना रिपोर्टिंग करण्यापासून रोखण्यात आल्याचाही रिपब्लिकचा दावा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 8:19 pm

Web Title: arnab goswamis complaint that he was beaten by the police was rejected by the court remand hearing begins aau 85
Next Stories
1 POK हा भारताचाच भाग हे पाकिस्तानने विसरु नये, राजनाथ सिंह यांनी ठणकावलं 
2 महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ल्याप्रकरणी अर्णब गोस्वामींवर एफआयआर दाखल
3 केरळनेही सीबीआयला रोखलं; राज्यात परवानगीशिवाय चौकशीला केला मज्जाव
Just Now!
X