काँग्रेस पक्षातील १०० नेत्यांनी पक्षातील अंतर्गत परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलं होतं, असा दावा काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा यांनी केला आहे. पक्ष विरोधी कारवाया व पक्ष शिस्तभंगांची कारवाई करत काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून झा यांना १४ जुलै रोजी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यानंतर झा यांनी पहिल्यांदाच अशाप्रकारचे मोठं वक्तव्य केलं आहे.  नेतृत्वासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची मागणी नेत्यांनी केल्याचा दावाही झा यांनी केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी १४ जुलै रोजी जारी केलेल्या पत्रकामध्ये पक्षविरोधी कारवाया केल्याने तसेच पक्षाची शिस्त मोडल्याने संजय झा यांना तत्काळ प्रभावाने पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे म्हटले होते. पक्षामधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आता झा यांनी पक्षावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने आपला मार्ग योग्य प्रकारे निवडला नाही तप पक्ष उद्धवस्त होईल असं म्हटलं होतं. एका लेखामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये विरोधी विचारांबद्दल असहिष्णुता आहे असं म्हटलं आहे. काँग्रेस भाजपावर ‘चुकीच्या पद्धतीने लोकशाही’ चालवण्याचा आरोप करते. तर दुसरीकडे स्वत:च्या पक्षामध्ये मात्र राजेशाही संस्कृतीला पाठिंबा देते असा टोलाही झा यांनी लगावला होता. याचबरोबर झा यांनी काँग्रेसच्या बिघडत्या परिस्थितीबद्दल पाच कारणंही सांगितली आहेत.

काँग्रेसला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी ही पारंपारिक पद्धतीने ४५ टक्क्यांपर्यंत आहे. सन १९८४ मध्ये इंदिरा गांधीच्या हत्येनंतर पक्षाला सर्वाधिक म्हणजेच ४८.१ टक्के मतं मिळाली होती. त्यानंतर काँग्रेसला मिळणारी मतं सातत्याने कमी होत आहेत. १९९८ मध्ये २५.८ टक्के, २००९ मध्ये २८.५ टक्के आणि २०१४ साली १९.५२ टक्के मतं काँग्रेसला मिळाल्याचे झा यांनी नमूद केलं आहे.

काँग्रेस सध्या देशातील अनेक मोठ्या राज्यांमधून जवळजवळ हद्दपार झाली आहे असंही झा यांनी म्हटलं आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, बिहार, गुजरात आणि ओडिशासारख्या मोठ्या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये मागील बऱ्याच काळापासून काँग्रेसला सत्ता स्थापन करता आलेली नाही. झा यांच्या सांगण्यानुसार काँग्रेसला त्यांच्या मतदारांच्या संख्येमध्ये म्हणावी तितकी वाढ करता आली नाही. पक्षाला तरुणांचा पाठिंबा मिळतानाही दिसत नसल्याचे निरिक्षण झा यांनी नोंदवले आहे. त्यांनी आपल्या लेखामधून पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. मागील २० वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाने केवळ दोन अध्यक्ष निवडले आहेत असंही झा यांनी म्हटलं आहे. १९९७ नंतर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची निवडणुक झालेली नाही. २०१९ नंतर पक्षाला स्थायी स्वरुपाचा अध्यक्ष नाही असंही झा यांनी लेखात म्हटलं आहे.

काँग्रेसला करुन दिलेली नेहरुंची आठवण

झा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर झा यांनी ट्विटवरुन काँग्रेसला नेहरुंच्या विचारसरणीची आठवण करुन दिली होती. “एकदा पंडित नेहरू यांनी स्वत:च्या विरोधात एका वृत्तपत्रात टीका करत सरकारला हुकुमशाहीकडे जात असल्याचं म्हणत इशारा दिला. लोकशाही, उदारमतवादी, सहनशील अशी सर्वांना एकत्र घेऊन जाणारी काँग्रेस खरी काँग्रेस आहे. आम्ही ती मूल्ये मागे ठेवली आहेत. का? तरीही पक्षाचा एक निर्भय सैनिक,” असं म्हणत झा यांनी काँग्रेसला नेहरूंनी स्वत:वर केलेल्या टीकेची आठवण करून दिली,