१५ जणांना सोडवण्यात यश, हवाई दलाची मदत

थेनी : तामिळनाडूतील थेनी जिल्ह्य़ातील कुरंगनी हिल्स येथील जंगलात लागलेल्या वणव्यात रविवारी ३६ विद्यार्थी अडकले. त्यातील १५ जणांना सोडवण्यात यश आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.

थेनी जिल्ह्यातील कुरंगनी येथील जंगलात कोईमतूर आणि इरोडे येथून सुमारे ३६ विद्यार्थी गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना जंगलात अचानक लागलेल्या आगीमुळे हे विद्यार्थी अडकून पडले. स्थानिक आदिवासी, पोलीस आणि बचाव पथकांच्या मदतीने त्यातील १५ जणांना वाचवण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अन्य विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी राज्याचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मदतीची मागणी केली. सीतारामन यांनी हवाई दलाच्या दक्षिण मुख्यालयाला मदतीसाठी सूचना दिल्या. हवाई दलाच्या सुलूर येथील तळावरून दोन हेलिकॉप्टर घटनास्थळी रवाना करण्यात येत असल्याचे सीतारामन यांनी ट्वीटद्वारे जाहीर केले. तसेच हवाई दलाच्या दक्षिण मुख्यालयाकडून थेनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.