जगातील सर्वाधिक मृत्यू; पाच लाखांहून अधिक बाधित

वॉशिंग्टन : करोना मृत्यूच्या संख्येत अमेरिकेने इटलीला मागे टाकले असून आता तेथे वीस हजाराहून अधिक  (२०,५८०) बळी गेले आहेत.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार करोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक बळी इटलीत गेले होते पण आता अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. करोना विषाणूचा प्रसार गेल्या वर्षी चीनमध्ये डिसेंबरमध्ये सुरू झाला होता. आता जगभरात या विषाणूने लाखावर बळी गेले असून अमेरिकेतील बळींची संख्या आता २०५९७ झाली आहे. इटलीतील मृतांची संख्या १९४६८ आहे.

अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या ५ लाख ३ हजार झाली आहे. स्पेन १६३०२७,  इटली १५२२७१, जर्मनी १२५४५२, फ्रान्स ९३७९० या प्रमाणे रुग्णांची संख्या आहे. अमेरिका व इटली नंतर मृतांची संख्या स्पेन १६९७२ , फ्रान्स १३८५२, ब्रिटन ९८७५ या प्रमाणे आहे.

चीनमध्ये ९९ नवीन रुग्ण

बीजिंग : चीनमध्ये करोनाचे ९९ रुग्ण सापडले असून गेल्या काही आठवडय़ातील ही उच्चांकी संख्या आहे. लक्षणे न दाखवणारे नवे ६३ नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या ८५,५०२ झाली आहे.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की, चीनमध्ये १,२८० परदेशातून आलेले रुग्ण असून ४८१ रुग्णांना सोडण्यात आले आहे. तर ७९९ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यात ३६ जणांची प्रकृती गंभीर आहे. करोनाचे नवे ९९ रुग्ण सापडले असून त्यात ९७ परदेशी लोक आहेत.  शनिवारी लक्षणे नसलेले ६३ रुग्ण सापडले असून त्यात १२ परदेशातून आलेले आहेत. लक्षणे नसलेले एकूण १०८६ रुग्ण असून ३३२ लोक परदेशातून आलेले आहेत.

न्यूयॉर्क करोनाचे प्रमुख केंद्र

न्यूयॉर्क शहर हे जगातील करोनाचे प्रमुख केंद्र असून ८३ लाख लोकसंख्येच्या शहरात लोकसंख्येची घनता अधिक आहे. शनिवारी रात्रीपर्यंत तेथे  मृतांची संख्या ८६२७ झाली असून रुग्णांची संख्या १,८०,००० आहे. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी देशातील पन्नास राज्यात मोठी आपत्ती जाहीर केली असून अमेरिकेतील ३३ कोटी लोकांपैकी ९५ टक्के लोक घरात बसून आहेत. ट्रम्प यांनी साठ हजार लष्करी जवान करोनाचा सामना करण्यासाठी तैनात केले आहेत. आमच्या लोकांना वाईट अवस्थेतून जावे लागले पण आम्ही योग्य तेच केले. आता करोनाची उतरण सुरू झाली आहे. मृतांची संख्या कमी होण्याच्या मार्गावर आहे. न्यूयॉर्कमध्ये परिस्थिती सुधारत असून लवकरात लवकर देशातील सर्व व्यवहार सुरू करण्याचा विचार आहे असे सांगून ट्रम्प यांनी म्हटले आहे, की अजून तरी व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

युरोपमध्ये ७५ हजारांहून अधिक मृत्यू

’युरोपमध्ये करोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांची संख्या ७५ हजारांहून अधिक झाली आहे. यापैकी ८० टक्के मृत्यू इटली, स्पेन, फ्रान्स व ब्रिटन या देशांमध्ये झाले आहेत.

’कोविड-१९ महासाथीचा सर्वाधिक फटका युरोप खंडाला बसला आहे. येथे ९,०९,६७३ लोकांना करोनाचा संसर्ग झाला.

’७५,०११ लोक मृत्युमुखी पडले आहेत. जगभरातील करोना बळींची संख्या १,०९,१३३ इतकी आहे.

’युरोपमध्ये करोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेला देश इटली हा असून तेथे १९,४६८ लोक मरण पावले आहेत.

’स्पेनमध्ये १६,९७२, फ्रान्समध्ये १३,८३२, तर ब्रिटनमध्ये ९८७५ लोकांचा मृत्यू ओढवला आहे.

जगभरात बळी १०९३०७

करोना विषाणूच्या संसर्गामुळे बळी पडलेल्यांची जगभरातील संख्या रविवारी १,०९,३०७ इतकी झाल्याचे एएफपी या वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांकडून संकलित केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्वप्रथम चीनमध्ये या महासाथीचा उगम झाल्यापासून १९३ देशांमध्ये करोनाची १७ लाख ८० हजार ७५० प्रकरणे नोंदण्यात आली आहेत. यापैकी किमान ३,५९,२०० लोक बरे झाल्याचे मानले जात आहे. अनेक देश केवळ अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांची चाचणी करत आहेत.

गेल्या फेब्रुवारीत पहिला बळी नोंदवण्यात आलेल्या अमेरिकेत जगातील सर्वाधिक, म्हणजे २० हजार ६०८ मृत्यू ओढवले असून, तेथील करोनाबाधितांची ५,३०,००६ ही संख्याही जगातील सर्वात जास्त आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इटलीत करोनामुळे १९,४६८ बळी गेले असून, १,५२,२७१ लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे.

स्पेनमध्ये १,६६,०१९ लोक करोनाबाधित असून १६,९७२ लोक मरण पावले आहेत. फ्रान्समध्ये १३,८३२ लोक मृत्युमुखी पडले असून १,२९,६५४ लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर ब्रिटनमध्ये करोनाबाधितांची संख्या ७८,९९१ इतकी असून, ९८७५ लोक या विषाणूमुळे मृत्युमुखी पडले आहेत.

हाँगकाँग व मकाऊ वगळता चीनने आतापर्यंत ३३३९ मृत्यू जाहीर केले आहेत. तेथे करोना संसर्गाची ८२,०५२ प्रकरणे झाली असून, ७७,५७५ लोक बरे झाले आहेत. शनिवारपासून तेथे करोनाबाधितांची ९९ नवी प्रकरणे झाली असली, तरी कुणाचाही मृत्यू झालेला नाही.

बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयातून सुटी

दोन आठवडय़ांपूर्वी करोनाचा संसर्ग झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रविवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. असे असले तरी जॉन्सन हे लगेच काम सुरू करणार नाहीत आणि ते बरे होईपर्यंत परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब हे त्यांच्या जागी काम पाहतील.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्यांची मदत अखेरीस अमेरिकेत पोहोचली

वॉशिंग्टन : हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्यांची भारताने पाठवलेली मदत अखेर अमेरिकेत पोहोचली आहे. प्रत्यक्षात हे मलेरियावरचे औषध आहे, पण ते करोनावर गुणकारी असल्याचे सांगण्यात येत  आहे.

करोनावरील उपचारासाठी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या गोळ्यांची मागणी केली होती. या गोळ्या भारताने अमेरिकेला दिल्या नाहीत तर गंभीर परिणाम होतील असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना फोन करून या गोळ्यांची मागणी केली पण त्यापूर्वीच या गोळ्यांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती.

ट्रम्प यांनी गंभीर परिणामांचा इशारा देताच भारताने या गोळ्या तातडीने अमेरिकेला पाठवल्या आहेत. भारताने एकूण ३५.८२ लाख गोळ्याचा साठा व नऊ मेट्रिक टन औषधी घटक अमेरिकेला पाठवले होते. मालवाहू विमानातून ही वैद्यकीय मदत तेथे पोहोचवण्यात आली.

औषधाचा उपयोग..

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध मलेरिया व तत्सम संसर्गावर वापरले जाते. या औषधाच्या वापरामुळे प्रतिकारशक्ती सुधारून विषाणूंवर मात करता येते असे ‘एनआयएच’ने म्हटले होते. अमेरिकेतील अनेक रुग्णालयांत या औषधाचा  वापर  सुरू आहे. फ्रान्समधील अभ्यासानुसार १०६१ रुग्णांवर या औषधाचा वापर केला असता त्यातील ९१.७ टक्के रुग्ण  दहा दिवसांत बरे झाले. या औषधामुळे १५ दिवसांत ९६ टक्के लक्षणे कमी होतात. पण या औषधाचा वापर प्रतिजैविकासमवेत करावा लागतो.