News Flash

बालाकोटमधील तळ पुन्हा सक्रिय

भारतीय हवाई दलाने उद्ध्वस्त केलेला बालाकोट येथील दहशतवाद्यांचा तळ पुन्हा कार्यान्वित झाला आहे.

५०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत : रावत

चेन्नई : भारतीय हवाई दलाने उद्ध्वस्त केलेला बालाकोट येथील दहशतवाद्यांचा तळ पुन्हा कार्यान्वित झाला आहे. या तळाची पाकिस्तानने फेरउभारणी केली असून तब्बल ५०० अतिरेकी भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

अधिकारी प्रशिक्षण अकादमीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना जनरल रावत म्हणाले की, फेब्रुवारीत भारतीय हवाई दलाने या तळावर लक्ष्यभेदी कारवाई करीत तो उद्ध्वस्त केला होता. त्याची पुरती हानी झाली होती. पण आता तो पुन्हा कार्यान्वित झाला असेल, तर पुढील कारवाई केवळ तळ उद्ध्वस्त करण्यापुरती नसेल, असा सूचक इशाराही त्यांच्या बोलण्यातून प्रकट झाला.

दहशतवादी तळ पुन्हा कार्यान्वित झाला असेल, तर पुन्हा लक्ष्यभेदी कारवाई करणार का, या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘‘आम्ही काय करणार, हे आताच का सांगावे? उलट त्यांना तर्कवितर्क करण्यात गुंतून राहू दे. कदाचित आधी जे केले त्याचीच पुनरुक्ती करण्याऐवजी आम्ही आणखी काहीसुद्धा करू शकतोच की!’’

हवाईदलाच्या हल्ल्यात त्या तळाची मोठी हानी झाली होती. बचावलेल्या दहशतवाद्यांना जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला होता. आता पुन्हा तिथे त्यांची जुळवाजुळव सुरू झाल्याची खबर आहे. त्यामुळे सीमेवर शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत आहे. नेमके किती घुसखोर सीमेपलीकडे तयारीत आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले की, घुसखोरांची संख्या माध्यमांकडून वेगवेगळी सांगितली जात आहे; पण ही संख्या किमान ५०० आहे. आता बर्फ वितळू लागला असल्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरू होण्याची खबर आहे. ही घुसखोरी रोखण्यासाठी आम्ही कमाल बंदोबस्त ठेवला आहे.

लष्कराला सर्वाधिकार

काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करावी तसेच महत्त्वाच्या शहरांमध्ये घातपात घडवावा, असा घुसखोरांचा इरादा असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. घुसखोरांना रोखण्यासाठी सरकारने लष्कराला सर्वाधिकार दिले असून त्या क्षणी जी योग्य वाटेल ती कारवाई करण्याची पूर्ण मुभा दिली आहे.

संपर्कातील अडथळा केवळ अतिरेकी आणि हस्तकांमध्येच!

काश्मीरमध्ये परिस्थिती कोलमडली आहे, संपर्क तुटलेला आहे, हा  अपप्रचार अतिरेकी गटांकडूनच सुरू आहे. संपर्कात अडथळा आहे तो केवळ अतिरेकी आणि पाकिस्तानातील त्यांचे हस्तक यांच्यातलाच, असा टोला लष्करप्रमुख रावत यांनी लगावला.

मेमन यांची टीका : निवडणुका जवळ आल्या की बालाकोटचा मुद्दा कसा काय चर्चेत आणला जातो, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मजिद मेमन यांनी केला आहे. लष्करप्रमुखांनी कुणाच्या राजकीय लाभासाठी विधाने करणे टाळावे, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 4:22 am

Web Title: around 500 terrorists waiting to enter india army chief bipin rawat zws 70
Next Stories
1 नागरिकांना एकच बहुपयोगी ओळखपत्र देण्याचा विचार
2 यंदाच्या खरीप हंगामात तांदूळ, डाळींच्या उत्पादनात घट?
3 अफगाणिस्तानात हवाई छाप्यांमध्ये ४० जण ठार झाल्याची शक्यता
Just Now!
X