* सात लाखांची लाच घेतल्याचा आरोप * २१ मेपर्यंत पोलीस कोठडी
सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली कोळसा खाणवाटप घोटाळ्याचा तपास करत असलेल्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथक प्रमुखालाच दिल्ली पोलिसांनी सात लाखांची लाच घेताना शुक्रवारी रात्री अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी एकंदर चार जणांना अटक केली आहे. कोळसा घोटाळ्याच्या तपासातून आपल्याला हटवण्यासाठीच हा डाव रचला गेला असल्याचा आरोप या अधिकाऱ्याने केला आहे.
दिनेशचंद गुप्ता या व्यापाऱ्याविरोधात अमर कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. दिनेश एका जमिनीच्या वादात अडकला आहे. त्याच्यावर फसवणुकीचाही गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरोधातील तक्रार रद्द करण्यासाठी कोळसा घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सीबीआय पथकाचे प्रमुख विवेक दत्त यांनी अमर कॉलनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर दबाव आणला होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी दत्त यांनी गुप्ताकडे १५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार गुप्ता याने राजेश पचिसिया या मध्यस्थामार्फत विवेक दत्त व त्यांचा सहकारी राजेशचंद्र कर्नाटक यांच्याकडे शुक्रवारी रात्री सात लाख रुपये पाठवले होते. पोलिसांनी या सर्वाना शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. दत्त, कर्नाटक, पचिसिया व गुप्ता यांनी शनिवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
षडयंत्राचा आरोप
दत्त यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप नाकारले आहेत. आपण या प्रकरणी निर्दोष असून कोळसा घोटाळ्याच्या तपासातून आपल्याला हटवण्यासाठी हे षडयंत्र रचले गेल्याचा आरोप दत्त यांनी केला आहे. दत्त यांच्या वकिलांनी न्यायालयात हा मुद्दा मांडताना दत्त यांच्या घरात कोणतीही रक्कम सापडली नसल्याचा दावा केला आहे.