किशनगंज येथील एका निवडणूक सभेत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी एआयएमआयएमचे वादग्रस्त नेते आणि तेलंगणचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांना अटक करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
किशनगंज जिल्ह्य़ातील कोचधमन पोलीस ठाण्यात ओवेसी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आल्यानंतर किशनगंजचे पोलीस अधीक्षक राजीव रंजन यांनी ओवेसी यांना अटक करण्याचे आदेश जारी केले.
याबाबत अकबरुद्दीन यांचे भाऊ आणि हैदराबादचे खासदार असउद्दीन ओवेसी यांना विचारले असता ते म्हणाले की, पक्षाचा विधी विभाग हे प्रकरण हाताळण्यास सक्षम आहे. एफआयआरची प्रत मिळाल्यानंतर पक्ष पुढील पावले उचलेल, असेही ते म्हणाले. कोचधमन विधानसभा मतदारसंघातील सोंथा हात येथे रविवारी झालेल्या जाहीर सभेत अकबरुद्दीन यांनी आपले भाऊवगळता अन्य सर्व खासदारांना लाखोली वाहिली आणि भाजपच्या नेत्यांविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्येही केली होती. गुजरातमध्ये तीन हजार जण ठार झाले होते आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काहीही केले नाही, याचे कोणालाही विस्मरण झालेले नाही, असेही ते म्हणाले.