सोनिया, राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण देण्याची भाजपची मागणी

आयसिसच्या एका हस्तकाला अटक होण्यापूर्वी तो गुजरातमधील ज्या रुग्णालयात कामाला होता त्या रुग्णालयाशी काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांचे अतिशय जवळचे संबंध असल्याच्या मुद्दय़ावरून भाजपने शनिवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. याबाबत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे.

अहमद पटेल यांचे सदर रुग्णालयाशी १९७९ पासून अतिशय जवळचे संबंध आहेत, असे नक्वी यांनी  पत्रकार परिषदेत सांगितले.

गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने तीन दिवसांपूर्वी आयसिसच्या दोन संशयितांना अटक केली. त्यापैकी एक आरोपी कासिम स्टिंबरवाला हा भडोच जिल्ह्य़ातील अंकलेश्वर येथील सरदार पटेल रुग्णालयात तंत्रज्ञ म्हणून कामाला होता. अहमद पटेल त्या रुग्णालयाचे यापूर्वी विश्वस्त होते, असा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी शुक्रवारी केला.

आरोपांमागे राजकारण नाही

राजकारणापेक्षाही भाजपला देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे, गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मलिन करण्याचा भाजप प्रयत्न करीत नाही, असे नक्वी म्हणाले.

काँग्रेसकडून खंडन

काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्यावर भाजपने केलेल्या आरोपांचे काँग्रेस पक्षाने जोरदार खंडन केले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव समोर दिसत असल्याने ते अशा प्रकारचा भयानक आरोप करीत आहेत. अहमद पटेल अथवा त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सदर रुग्णालयाचे विश्वस्त नाहीत, अथवा त्यांची रुग्णालयाच्या प्रशासनात कोणतीह भूमिका नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केले.