मुंबईवर हल्ला करणाऱया दहशतवादी अजमल कसाबने प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवादी संघटनेतूनच मोहम्मद नावेदने दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती चौकशी दरम्यान समोर आली आहे. जम्मूच्या उधमपूरातून जिंवत ताब्यात घेण्यात आलेल्या लष्करे तैय्यबा संघटनेचा दहशतवादी मोहम्मद नावेदचे लष्करे मर्कझ तैय्यबाच्या कॅम्पमध्ये गेले तीन महिने दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण झाले होते. याच संघटनेतून अजमल कसाबला मुंबईवरील हल्ल्यासाठी तयार करण्यात आले होते.
सुत्रांच्या माहितीनुसार, दक्षिण काश्मिरात दहशतवादी कारवाया करणाऱया कासिम खान(सांकेतिक नाव) याच्या नेतृत्त्वाखाली नावेद काम करीत होता. मोहम्मद नावेद हा पाकिस्तानच्या फैसलाबाद येथील रहिवासी आहे. १९९५ साली जन्म झालेल्या नावेदचे केवळ पाचवी पर्यंतचे शिक्षण होऊ शकले. एकाच इयत्तेत तो नापास होत असे. शिक्षणाशी जुळवून घेता न आल्याने नावेदने अनेक ठिकाणी काम केले. परंतु, कायमस्वरूपी रोजगार मिळविण्यात अपयशी ठरल्याने नावेदच्या वडिलांनी त्याला घराबाहेर हाकलून दिले होते. पुढे जाऊन तो लष्करे तैय्यबाच्या संपर्कात आला आणि दहशतवादी कारवाया करण्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली.