सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलन

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी मंगळुरू येथे पोलिस गोळीबारात दोन जण ठार झाल्याची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस.येडीयुरप्पा यांनी दिले आहे. त्यांनी गुरुवारच्या हिंसाचारानंतर आज तेथे भेट दिली, त्या वेळी संचारबंदी शिथिल करण्याचे आदेशही जारी केले.

जे लोक मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई जाहीर करण्यास जिल्हा प्रशासनास सांगितले आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले, की संचारबंदी मागे घ्यावी अशी सर्वाचीच इच्छा दिसून आली. त्यामुळे अधिकारी व गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून ती दुपारी ३ ते सायंकाळी सहा या काळात शिथिल करण्यात आली आहे. पण रात्रीची संचारबंदी लागू राहील, उद्या संपूर्ण दिवसभर संचारबंदी शिथिल करण्यात येईल. पण रात्री पुन्हा संचारबंदी राहील. सोमवारी संचारबंदी पूर्ण मागे घेतली जाईल. पण प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील.

प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना मंगळुरूत गुरुवारी निदर्शनांवेळी हिंसाचार झाला होता. त्यानंतर काही भागात संचारबंदी शुक्रवारी रात्री लागू करण्यात आली. त्यानंतर ती मंगळुरू आयुक्तालयाच्या सर्व क्षेत्रात २२ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात आली. जे दोन जण मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी शनिवारी भेट घेतली. ख्रिश्चन व मुस्लीम समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. मंगळुरूतील घटनांची चौकशी कशा प्रकारे करायची याचा निर्णय गृहमंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाईल, असे सांगून ते म्हणाले, की त्या दिवशी एका इमारतीभोवती गर्दी जमली होती, त्या इमारतीत अग्निशस्त्रे होती. त्यातूनच तिथे हिंसाचार झाल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला. केरळातून आलेल्या पत्रकारांना अटक केल्याबाबत त्यांनी सांगितले, की ते का आले होते व त्यांनी कुठल्या कृती केल्या यासह सर्व गोष्टींची चौकशी केली जाईल.

सरकारनेच हिंसाचार घडवून आणल्याचा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेला आरोप बेजबाबदारपणाचा असल्याचे येडीयुरप्पा यांनी म्हटले आहे.

दोन तास संचारबंदी शिथिल; बाजारपेठांत खरेदीसाठी गर्दी

मंगळुरूत दोन तास संचारबंदी शिथिल करताच दुकानांमध्ये गर्दी झाली होती. दुकानदारांनी त्यांच्याकडे असलेला शिल्लक माल संपवून टाकला. पोलिस आयुक्त पी. एस हर्ष यांनी सांगितले, की रविवारी रात्रीपर्यंत संचारबंदी लागू राहील. स्थानिक वाहिन्यांवरून संचारबंदी शिथिल केल्याचे जाहीर केल्याने काही लोकांना ते समजलेच नाही. मोबाइल इंटरनेट सेवा अजूनही बंद ठेवण्यात आली आहे. बस सोडून काही वाहने सुरू होती. राज्याचे माजी मंत्री व मंगळुरूचे आमदार यू. टी खादेर यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात नागरिकत्व कायदा लागू केल्यास कर्नाटक पेटेल असे वक्तव्य खादेर यांनी केल्याची तक्रार भाजयुमोचे सचिव संदेशकुमार शेट्टी यांनी केली होती.

दिल्लीतील हिंसाचारप्रकरणी भीम आर्मी प्रमुखांसह १६ जण अटकेत

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना जुन्या दिल्लीतील दर्यागंज परिसरातील हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आली. आझाद यांच्या संघटनेने जामा मशीद ते जंतर मंतर अशा मोर्चाचे आयोजन शुक्रवारी केले होते.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात हे आंदोलन पोलिसांच्या परवानगीविना केले जाणार होते. शुक्रवारी सायंकाळी सुरक्षा जवानांनी आझाद यांना पकडण्याचा प्रयत्न केला. नंतर आझाद हे मशिदीत सापडले. शनिवारी जामा मशिदीतून बाहेर येताच त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आधी त्यांना ताब्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली. त्यांना चाणक्यपुरी येथे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात ठेवण्यात आले. नंतर त्यांना मध्य जिल्हा पोलिसांच्या हवाली करण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दर्यागंज हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची एकूण संख्या १६ झाली आहे.

बिहारमध्ये जनजीवन विस्कळीत; आसाममध्ये शांतता 

बिहारमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधातील बंदमुळे रेल्वे व रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. पश्चिम बंगाल, आसाम व मेघालयात शांतता होती.  पाटणा येथे राजद समर्थकांनी रेल्वे स्थानके  व बस स्थानकांत घुसून आंदोलन केले. नावडा येथे महामार्ग क्रमांक ३१ वर निदर्शने करण्यात आली. तेथे टायर जाळण्यात आले तसेच रस्तेही बंद करण्यात आले. मुझफ्फरपूर येथे झिरो माइल चौक येथे आंदोलन करण्यात आले. ठिय्या दिल्यामुळे अरारिया, पूर्व चंपारण जिल्ह्य़ात रेल्वेसेवा विस्कळीत झाली.