मागच्या चार वर्षात केंद्रातल्या अहंकारी नरेंद्र मोदी सरकारने काँग्रेसला संपवण्याचे सर्व प्रयत्न केले. पण काँग्रेस झुकली नाही आणि झुकणारही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सोबतच्या लोकांचे घोटाळे, भ्रष्टाचार आम्ही उघड करत राहू असे सोनिया गांधी म्हणाल्या. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी दिल्लीत ८४ व्या महाअधिवेशनात बोलत होत्या.

काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात ज्या योजना सुरु होत्या त्याकडे आज मोदी सरकार दुर्लक्ष करतेय त्याचे दु:ख होते असे सोनिया म्हणाल्या. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात आर्थिक विकास वेगाने सुरु होता असे त्या म्हणाल्या. कोणत्या परिस्थितीत मी सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश केला ते तुम्हाला माहिती आहे. पक्ष कमकुवत होतोय हे जेव्हा माझ्या लक्षात आले. त्यावेळी काँग्रेसजनांच्या भावना लक्षात घेऊन मी राजकारणात प्रवेश केला.

४० वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी चिकमंगळुरुमध्ये मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय राजकारणच बदलून गेले. आज पुन्हा एकदा आपल्या पक्षाला तशाच कामगिरीची गरज आहे असे सोनिया म्हणाल्या. काँग्रेस पक्षाला अधिक बळकट कसे करायचे तेच आज आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहे. मी राहुल गांधींचे अभिनंदन करते त्यांनी अत्यंत कठिण काळात पक्षाची धुरा खांद्यावर घेतली आहे. पक्षाचा विजय हा देशाचा विजय आहे. काँग्रेस फक्त एक राजकीय पक्ष नाहीय ती एक चळवळ आहे असे सोनिया म्हणाल्या.