हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा यांची टीका

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा यांनी येथील मेळाव्यात काँग्रेस पक्षाला आव्हान देत मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी जाहीर केली. अनुच्छेद ३७० वरून काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीकास्त्र सोडले. माझा पक्ष या मुद्दय़ावर भरकटला असून, पहिल्यासारखा राहिलेला नाही अशा शब्दांत हुडा यांनी नाराजी व्यक्त केली. चार दशके काँग्रेसमध्ये असलेले हुडा दोन वेळा हरयाणाचे मुख्यमंत्री होते.

हरयाणात या वर्षी ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. हुडा यांनी या परिवर्तन मेळाव्यात जाहीरनामाही घोषित केला. स्थानिक नागरिकांना नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा त्यांनी केली. सगळ्या बंधनातून मुक्त होऊन या सभेला आलो आहे अशा शब्दांत त्यांनी भाषणाची सुरुवात केली. त्यामुळे हुडा आता काँग्रेसमध्ये राहणार काय, असा प्रश्न आहे. केंद्र असो वा राज्य सरकार त्यांच्या चांगल्या कामाला दाद दिलीच पाहिजे. त्यामुळे काश्मीरबाबतचे अनुच्छेद ३७० हटविण्याचे समर्थन केल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्या अनेक सहकाऱ्यांनी अनुच्छेद ३७० रद्द करण्यास विरोध केला. माझा पक्ष भरकटला आहे अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली. देशभक्ती व आत्मसन्मानाच्या मुद्दय़ावर मी तडजोड करणार नाही असेही त्यांनी बजावले. भाषणात त्यांनी राज्यातील भाजपच्या मनोहरलाल खट्टर सरकारवर टीकास्त्र सोडले.

सरकारने पाच वर्षांत काय केले याचा हिशेब त्यांना द्यावा लागेल. केंद्राने काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाच्या आडून राज्य सरकारला राजकारण करता येणार नाही, असे हुडा यांनी बजावले.