पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने राज्यसभेमध्ये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यासंदर्भातील ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयानंतर सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत झाले. पण पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबल्या. त्याने या निर्णयाबाबत संयुक्त राष्ट्रांवर टिका केली आणि अमेरिकेने या प्रकरणामध्ये लक्ष द्यावे, असेही ट्विटच्या माध्यमातून सुचवले. यावर माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने आफ्रिदीला चांगलाच टोला लगावला आहे.

संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार काश्मीरी जनतेचे अधिकार अबाधित राहिले पाहिजेत अशा अर्थाचे ट्विट आफ्रिदीने केले होते. या प्रदेशात आक्रमकपणे घेण्यात येणारे निर्णय आणि येथील गुन्ह्यांची दखल घ्यायला हवी असे आफ्रिदी म्हणाला होता. “संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार काश्मीरी जनतेला त्यांचे अधिकार द्यायला हवेत. आपल्यासारखा त्यांनाही स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे. संयुक्त राष्ट्रांची स्थापना का झाली आहे आणि ते आता झोपले आहेत का? काश्मीरमध्ये मानवतेविरुद्ध वापरली जाणारी आक्रामकता आणि गुन्ह्यांची दखल घ्यायला हवी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात मध्यस्थी करायला हवी”, असे ट्विट आफ्रिदीने केले होते.

त्यावर गौतम गंभीरने ट्विट करत टोला लगावला आहे. “मानवतेविरुद्ध वापरली जाणारी आक्रमकता हा आफ्रिदीचा मुद्दा अगदी बरोबर आहे. याबद्दल आफ्रिदीचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले पाहिजे. पण तो एक गोष्ट विसरला आहे ते म्हणजे हे सारं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घडतं हे लिहिण्याचं त्याच्याकडून राहून गेलं. पोरा (आफ्रिदीला उद्देशून), तू या सगळ्याची काळजी करू नको. आम्ही आमचं बघून घेऊ.

दरम्यान, मोदी सरकारने राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार करण्याचा ठराव राज्यसभेत मंजूर केला आहे. पाच तासांच्या वादळी चर्चेनंतर राज्यसभेने या निर्णयांना मंजुरी दिली असून आज (मंगळवारी) लोकसभेत त्यांच्यावर शिक्कामोर्तब होण्याची औपचारिकता उरली आहे. देशभर या निर्णयाचे जल्लोषात स्वागत सुरू आहे.