पीडीपी चीफ आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी यापुर्वी कलम ३७०साठी कितीही काळ लढा देण्यास तयार असल्याचं म्हटलं होत. दरम्यान, पुन्हा एकदा त्यांनी कलम ३७० वरुन भाजपावर टीका केली आहे. मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या. “भाजपा ७० वर्ष संघर्ष करते आणि कलम ३७० बेकायदेशीर आणि असंवैधानिकपणे रद्द करते तर आपण आपल्या अधिकारांसाठी संघर्ष का करत नाही. लोकांनी नेहमी आपल्या संघर्षात बलिदान दिले आहे”.

“मला लोकांना सांगायचे आहे की जेव्हा तुम्ही धर्माच्या आधारे भारताची निवड केली, तेव्हा काश्मिरींनी तुमचे समर्थन केले तर बाकीचे पाकिस्तानात गेले. आम्ही त्यावेळी धर्माचे समर्थन केले नाही, आम्ही सरकारी सैन्याचे व बंधुत्वाचे समर्थन केले. मात्र, राज्यघटनेचा भंग करून आज भाजपाने जम्मू-काश्मीरचं अस्तित्व संपवलं” अशी टीका मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपावर केली आहे.

कलम ३७०साठी कितीही काळ लढा देण्यास तयार

यापुर्वी गेल्या महीन्यात मेहबुबा मुफ्ती यांनी कलम ३७०साठी कितीही काळ लढा देण्यास तयार असल्याचं जाहीर केलं होतं. “जम्मू-काश्मीरची जनता घटनात्मक, लोकशाहीच्या आणि शांततापूर्ण मार्गांनी लढा देईल. मग तो लढा कितीही महिने किंवा वर्ष चालला तरी चालेल. पण आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करू. हा आमच्या ओळखीचा प्रश्न आहे. आम्हाला ते पाकिस्तानकडून मिळालेलं नाही. ते आम्हाला आमच्या देशानं, जवाहरलाल नेहरूंनी, सरदार पटेल यांनी दिलं आहे”, असं मेहबुबा मुफ्ती यांनी जाहीर केलं होतं.