News Flash

कलम ३७० पुन्हा लागू होईल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे मूर्खपणा – ओमर अब्दुल्ला

कलम ३७० काश्मीरमध्ये पुन्हा लागू होण्याचा मुद्दा आम्ही अजून सोडलेला नाही, अशी भूमिका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी मांडली आहे.

omar abdullah on article 370
कलम ३७०वरून ओमर अब्दुल्ला यांची मोदी सरकारवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांसोबत काश्मीरमधील शांतता प्रक्रिया आणि राजकीय प्रक्रियेची पुनर्स्थापना या मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीनंतर अनेक नेत्यांनी समाधानकारक चर्चा झाल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र या बैठकीनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मात्र वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. “आज देशात अस्तित्वात असलेल्या सरकारकडून जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू होईल, ही अपेक्षा ठेवणं मूर्खपणा आहे”, असं ते म्हणाले आहेत. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी बैठकीनंतर कलम ३७० च्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

भाजपाला यासाठी ७० वर्ष लागली!

ओमर अब्दुल्ला यांनी कलम ३७० च्या मुद्द्यावरून भाजपावर परखड टीका केली. “भाजपाला कलम ३७० बाबतचा त्यांचा राजकीय अजेंडा पूर्ण करण्यासाठी ७० वर्ष लागली आहेत. आपला लढा तर आत्ता कुठे सुरू झाला आहे. या चर्चांमधून कलम ३७० राज्यात पुन्हा लागू होईल, असं सांगून आम्हाला लोकांना फसवायचं नाहीये. या सरकारकडून कलम ३७० पुन्हा लागू होईल, अशी अपेक्षा ठेवणं मूर्खपणा आहे”, असं अब्दुल्ला म्हणाले. “ही बैठक फक्त पहिली पायरी आहे. दोन्ही बाजूंनी विश्वासाचं वातावरण निर्माण व्हायला वेळ लागेल”, असं देखील ते म्हणाले.

आम्ही मुद्दा सोडलेला नाही

दरम्यान, कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा मुद्दा पंतप्रधानांसोबतच्या बैठकीमध्ये न मांडल्यामुळे काश्मीरमधील राजकीय पक्षांनी हा मुद्दा सोडल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यावर ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “आम्ही कलम ३७० चा मुद्दा सोडलेला नाही. आम्ही ते कायदेशीररीत्या करू. शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गांनी करू. आम्ही त्यासाठी नियोजनपूर्वक लढा देत आहोत. सर्वोच्च न्यायालयात यावर लढा सुरू आहे. तिथे आम्हाला चांगली संधी आहे”, असं ओमर अब्दुल्ला म्हणाले आहेत.

कलम ३७०साठी कितीही काळ लढा द्यावा लागला, तरी तयार – मेहबूबा मुफ्ती

मेहबूबा मुफ्तींचाही कलम ३७० साठी नारा

दरम्यान, पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी देखील कलम ३७० वरून केंद्रावर निशाणा साधला आहे. “जम्मू-काश्मीरची जनता घटनात्मक, लोकशाहीच्या आणि शांततापूर्ण मार्गांनी लढा देईल. मग तो लढा कितीही महिने किंवा वर्ष चालला तरी चालेल. पण आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करू. हा आमच्या ओळखीचा प्रश्न आहे. आम्हाला ते पाकिस्तानकडून मिळालेलं नाही. ते आम्हाला आमच्या देशानं, जवाहरलाल नेहरूंनी, सरदार पटेल यांनी दिलं आहे”, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2021 12:09 pm

Web Title: article 370 national conference leader omar abdullah on meeting with pm narendra modi pmw 88
Next Stories
1 यावर्षी नवी मुंबईत सुरू होणार JIO INSTITUTE; नीता अंबानी यांची घोषणा!
2 कतरिनामुळे सलमानने जॉनशी बोलणे केले होते बंद?
3 “मी भारतात पाऊल ठेवताच करोना नष्ट होईल”; नित्यानंदचा अजब दावा
Just Now!
X