जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तान आता हा विषय ओआयसीमध्ये घेऊन गेला आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनच्या (ओआयसी) आज होणाऱ्या बैठकीत जम्मू-काश्मीरमधल्या घडामोडींसंदर्भात चर्चा होणार आहे. ओआयसी ही इस्लामबहुल देशांची संघटना आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय या बैठकीतील महत्वाचा मुद्दा असेल.

सौदी अरेबियात जेद्दाहमध्ये ही बैठक होणार असल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी दिली. ओआयसीच्या जम्मू-काश्मीरवरील कॉन्टॅक्ट ग्रुपने ही बैठक बोलवली आहे. जम्मू-काश्मीरमधल्या बेकायदा घडामोडींसदर्भात या बैठकीत चर्चा होईल असे फैझल यांनी सांगितले. ओआयसीच्या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री एसएम कुरेशी पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार लोकशाही मार्गाने काश्मीर प्रश्नावर शांततामय मार्गाने तोडगा काढावा असे टि्वट ओआयसीने ४ ऑगस्टला केले होते. जम्मू-काश्मीरला संपूर्णपणे भारताचे अविभाज्य अंग बनवण्याच्या या निर्णयामुळे पाकिस्तान मोठया प्रमाणावर अस्वस्थ आहे. काश्मीर प्रश्नी जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पाकिस्तानचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पाकिस्तानने काश्मीरमधल्या घडामोडींसंदर्भात संयुक्त राष्ट्रालाही पत्र लिहिले आहे.

दरम्यान भारताने घेतलेल्या या निर्णयासंदर्भातील घडामोडींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत असं अमेरिकेने म्हटलं आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने दिलेल्या या प्रतिक्रियेमध्ये पाकिस्तानचा साधा उल्लेखही केलेला नाही. ‘अनुच्छेद ३७०’ रद्द करण्यासंदर्भातील सर्व घडामोडींवर आमचे लक्ष असून सर्वांनी नियंत्रण रेषेवर शांतता आणि स्थैर्य कायम राहिल यासाठी प्रयत्न करावेत असं अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकन परदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या मॉर्गन ओर्टागस यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पाकिस्तानचा थेट उल्लेख टाळत एक सूचक वक्तव्य केले आहे. ‘नियंत्रण रेषेवर सर्व पक्षांनी शांतता आणि स्थैर्य कायम ठेवावे असे आवाहन आम्ही करत आहोत,’ असं मॉर्गन म्हणाल्या.