रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा इशारा

भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआय) साधे आणि कौशल्याधारित असे दोन्ही प्रकारचे रोजगार हिरावून घेतले जातील, असे मत भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले. केरळ सरकारने कोची येथे आयोजित केलेल्या जागतिक डिजिटल परिषदेत ते बोलत होते.

कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि यंत्रांना विचार करण्याची क्षमता प्रदान करणे अशा क्षेत्रांतील प्रगतीमुळे भविष्यात मानवाकडून कुशल आणि अकुशल असे दोन्ही प्रकारचे रोजगार हिरावून घेतले जाणार आहेत. पुढील १० ते १५ वर्षांनंतर मानवासाठी केवळ अशीच कामे उरतील ज्यांत अत्युच्च वैचारिक क्षमतेची किंवा विशेष मानवी भावभावनांची अथवा कौशल्यांची गरज असेल, असे त्यांनी या परिषदेतील त्यांच्या बीजभाषणात म्हटले.   मात्र यांत्रिकीकरणाने मानवी रोजगार जातील, यंत्रे मानवांची जागा घेतील अशा भीतीपोटी भारताने तांत्रिक प्रगतीत जगाच्या मागे पडता कामा नये. तंत्रज्ञान स्वाकारण्यातील मोठी अडचण म्हणजे यंत्रे मानवाची कामे करू लागतील ही भीती होय. पण तंत्रज्ञातील क्रांती होऊन २०० वर्षे उलटली तरी अद्याप मानवाकडे बरीच कामे शिल्लक आहेत. त्यामुळे ही भीती अनाठायी आहे. जी कामे यंत्रे करू शकत नाहीत अशी विशेष कामे कायम मानवाकडेच राहतील. तंत्रज्ञानामुळे रोजगारांचे स्वरूप बदलेल. विशेष क्षमता आणि कल्पकतेची गरज असलेली कामे मानवाकडेच राहतील, असे राजन म्हणाले.

..त्यामुळे ट्विटरवर नाही

माझ्याकडे झटपट विचार करण्याची आणि कमी शब्दांत विचार प्रकट करण्याची क्षमता नसल्याने मी ट्विटरवर नाही, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केरळमधील कोची येथील ग्लोबल डिजिटल समिट या कार्यक्रमात सांगितले. समाजमाध्यमांवर ते फारसे नसल्याबद्दल त्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजन यांनी हे उत्तर दिले. एखादी गोष्ट तुम्ही सुरू केली की त्यात सातत्य ठेवावे लागते. माझ्याकडे एखाद्या विषयावर पटकन विचार करून त्यावर १४० शब्दांत तेही २० ते ३० सेकंदांत प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे कसब नाही. त्यामुळे मी ट्विटर किंवा इतर समाजमाध्यमांचा फारसा वापर करत नाही, असे ते म्हणाले.