अर्थमंत्री अरूण जेटली यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर आज (शनिवार) मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाणार आहे. जेटली (वय ६५) यांना गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाचा त्रास होत आहे. त्यामुळे सोमवारी त्यांना कार्यालयातही जाता आले नाही. त्यांनी स्वत:च याबाबत गुरूवारी ट्विट करून आपण मूत्रपिंड विकाराने त्रस्त असल्याचे सांगितले होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. आज त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली जाईल. मूत्रपिंड दात्याशी संबंधित प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. जेटली हे पुढील आठवड्यात दहाव्या भारत-ब्रिटन आर्थिक आणि वित्तीय वार्ता परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला जाणार होते. परंतु, त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. अपोलो रूग्णालयाचे मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. संदीप गुलेरिया हे जेटलींवर शस्त्रक्रिया करणार आहेत. डॉ. संदीप हे एम्सचे संचालक आणि जेटलींचे निकटचे मित्र रणदीप गुलेरिया यांचे भाऊ आहेत.

दीर्घ मधुमेहामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळेच हा विकार उद्भवल्याचा तर्क आहे. याबाबत अधिकृत दुजोरा मात्र देण्यात आलेला नाही. मोदी सरकार सत्तेत येताच २०१४मध्ये ही शस्त्रक्रिया झाली होती. मात्र त्यात गुंतागुंत उद्भवल्याने त्यांना तातडीने आयुर्विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात दाखल करावे लागले होते.