आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सट्टेबाजी केल्याचा आरोप असलेल्या ललित मोदी यांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अत्यंत चांगल्या हेतूने मदत केल्याचे ठोस प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले. जेटली यांनी स्वराज यांची पाठराखण करीत भाजप व सरकार त्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली. ते म्हणाले की, स्वराज यांनी कोणतीही चूक केलेली नाही. मानवतेच्या भावनेतून त्यांनी मदत केली आहे. कुणाही मंत्र्याने घेतलेल्या निर्णयाची सामूहिक जबाबदारी मंत्रिमंडळाची असते; परंतु प्रत्येक मंत्री स्वतंत्रपणे निर्णय घेत असतो. ललित मोदी यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे. त्यामुळे ललित मोदी यांना सरकार वाचविण्याच्या प्रयत्न करीत असल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असे जेटली यांनी स्पष्ट केले.
जेटली व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत स्वराज यांच्या निर्णयाचे समर्थन केले. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेच्या दोन तासांपूर्वी स्वराज यांनी उभय नेत्यांची भेट घेतली होती. एकीकडे स्वराज यांच्यासाठी सरकार व भाजप एकजूट होत असताना काँग्रेसने मात्र विरोध कायम ठेवला आहे. स्वराज यांच्याविरोधात काँग्रेसच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी निदर्शने केलीत. सुषमा स्वराज यांनी ललित मोदी यांना पत्नीच्या उपचारासाठी प्रवासविषयक कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी ब्रिटनचे खासदार कीथ वाझ यांना पत्र लिहिले होते.
राजीनाम्याच्या मागणीवर काँग्रेस ठाम
स्वराज यांनी ललित मोदी यांना मदत केल्याचे प्रकरण इतक्यात शमण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वराज यांच्याविरोधात जणू काही आघाडीच उघडली आहे. स्वराज यांच्या राजीनाम्याचा मुद्दा पावसाळी अधिवेशन सुरू होईपर्यंत जिवंत ठेवायचा आहे. काँग्रेस पक्षाच्या विविध संघटना स्वराज यांच्या विरोधात निदर्शने करीत आहेत. युवक काँग्रेसनंतर महिला काँग्रेसच्या सदस्यांनी स्वराज यांच्याविरोधात आंदोलन केले. काळा पैसा मायदेशी आणण्याची भाषा करणारे भ्रष्टाचाऱ्यांची मदत करीत आहेत, अशा आशयाच्या घोषणा निदर्शकांनी दिल्या. दरम्यान, स्वराज यांनी राजीनामा देण्याच्या तयारीत होत्या, असे वृत्त पसरले होते. पक्षाकडून यासंबंधी कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. शिवाय स्वराज यांना राजीनामा न देण्याची सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केल्याचेही वृत्त पसरले होते. मात्र स्वराज यांनी थेट पंतप्रधानांनाच याप्रकरणी विश्वासात घेतले होते; त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा सूत्रांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा व ललित मोदी यांचे एकत्रित छायाचित्र काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी प्रसारमाध्यमांकडे दिले.

वसुंधरा राजेंवर ललित मोदींना मदत केल्याचा आरोप
नवी दिल्ली : ललित मोदींना मदत केल्याप्रकरणी सुषमा स्वराज यांच्यानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे या वादात अडकल्या आहेत. त्यांच्यावर २०११ मध्ये मोदी यांना ब्रिटनमध्ये वास्तव्य करण्यासाठीच्या अर्जासंबंधी कागदपत्रे बनविण्यात मदत करण्याचा आरोप करण्यात आला आहे.  यावर राजे यांनी आपण ललित मोदी व त्यांच्या कुटुंबीयांना ओळखते, मात्र कागपत्रे व इतर कशाशीही आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेसने राजे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.