विविध राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसल्याचे दिसत आहे. कोणत्याही परिस्थिती सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (गुरूवार) गुजरात, हिमाचल आणि कर्नाटक राज्याच्या निवडणूक प्रभारींची नेमणूक केली. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरातची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर गुजरातसाठी नरेंद्र सिंह तोमर, निर्मला सीतारमण, जितेंद्र सिंह, पी.पी. चौधरी यांना सह-प्रभारी म्हणून नेमले आहे. गुजरातमधील निवडणूक ही मोदींसाठी प्रतिष्ठेची असून त्यासाठी पक्षाने या राज्याकडे विशेष लक्ष दिले आहे.

केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांना हिमाचल प्रदेश तर मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे कर्नाटक भाजपच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तीन राज्यात येत्या ६ महिन्यांत निवडणुका होणार आहेत. गुजरातमध्ये भाजप २००१ मध्ये सत्तेवर आला होता. तर हिमाचल आणि कर्नाटक येथून गतवेळी त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची ही पहिलीच वेळ आहे.