केजरीवाल यांचे स्पष्टीकरण

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबद्दल अपमानकारक शब्दांचा वापर करण्याच्या सूचना आपण वकिलांना दिल्या नव्हत्या, असा दावा करणारे बनावट प्रतिज्ञापत्र सादर केल्याच्या वृत्ताचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात खंडन केले.

जेटली यांनी केजरीवाल आणि आपच्या अन्य पाच नेत्यांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची उलटतपासणी सुरू असताना चुकीचे निवेदन केल्याबद्दल केजरीवाल यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी जेटली यांनी याचिकेद्वारे केली, त्या संदर्भात २३ ऑगस्ट रोजी केजरीवाल यांच्यावर नोटीस बजावण्यात आली होती, त्याला उत्तर देताना केजरीवाल यांनी वरील खंडन केले.

जेटली यांनी केजरीवाल आणि आपच्या अन्य पाच नेत्यांविरुद्ध १० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला आहे. जेटली यांच्याविरुद्ध अपमानकारक शब्दांचा वापर करण्याच्या सूचना वकिलांना दिल्या नव्हत्या, हा केजरीवाल यांचा दावाच खोटा असल्याचा आरोप करणारी याचिका जेटली यांनी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ एप्रिल रोजी घेण्याचे उच्च न्यायालयाने मुक्रर केले आहे.

केजरीवाल यांची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध १० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला असून त्याबाबत जेटली यांनी जे म्हणणे मांडले आहे ते रद्द करण्याची मागणी करणारी केजरीवाल यांची याचिका मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली.