अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचा पदभार देण्यात आला आहे. यंदाचा हंगामी अर्थसंकल्प पीयूष गोयल सादर करण्याची शक्यता आहे. येत्या १ फेब्रुवारीस हंगामी अर्थसंकल्प सादर होणार आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पीयूष गोयल यांची हंगामी अर्थ आणि कार्पोरेट मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार दिल्याचे राष्ट्रपती भवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. ही दोन्ही मंत्रालये जेटलींकडे होती.

निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार अरुण जेटली यांची प्रकृती जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत गोयल हे या मंत्रालयाचे मंत्री राहतील.

अरुण जेटली सध्या आजारी असून त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू आहेत. यापूर्वी त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यार्पणाची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हाही पीयूष गोयल यांच्याकडेच अर्थमंत्रालयाचा पदभार होता.