भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. मोदी सरकारचे संकटमोचक अशी त्यांची ओळख होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. सरकाच्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर वेगवेगळया जबाबदाऱ्या सोपवल्या. त्या त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केल्या. भाजपाची रणनिती आखण्यातही जेटली यांची महत्वाची भूमिका होती.

भाजपाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्याप्रमाणे अरुण जेटली सुद्धा वकिलीच्या पेशाकडून राजकारणाकडे वळले. संसदेत अरुण जेटली जरी आक्रमक भासत असले तरी सर्वपक्षात त्यांचे मित्र होते. पेशाने वकिल असणारे अरुण जेटली उत्तम वक्ते होते. त्यांनी अनेकवेळा आपल्या जोरदार भाषणांनी विरोधकांना निरुत्तर केले. त्यांच्या आरोपातील हवा काढून घेतली. भाजपा दुसऱ्यांदा केंद्रात पूर्ण बहुमताने सत्तेत आल्यानंतर अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आरोग्याच्या कारणामुळे आपल्याला नव्या सरकारमध्ये कुठली जबाबदारी स्वीकारता येणार नाही असे कळवले होते.

मागच्या काही महिन्यात अरुण जेटली सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फारसे दिसले नव्हते. सरकारच्या वेगवेगळया निर्णयांवर ब्लॉग आणि सोशल मीडियामधून ते संवाद साधायचे. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सरकारमधील सर्वात प्रभावशाली मंत्री अशी अरुण जेटली यांची ओळख होती. पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींनी त्यांच्याकडे अर्थ, संरक्षण आणि माहिती-प्रसारण या तीन मंत्रालयांची जबाबदारी सोपवली होती. मागच्यावर्षी मे महिन्यात त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. फेब्रुवारी महिन्यात अंतरीम अर्थसंकल्प मांडला त्यावेळी जेटली भारतात नव्हते. ते अमेरिकेत उपचारासाठी गेले होते.