अरुण जेटली यांचा दावा; काँग्रेस राजकीय आघाडीच्या तळाला
राष्ट्रवादाच्या विचारसरणीबाबत आम्ही पहिली लढाई जिंकली आहे कारण जे लोक देशविरोधी घोषणाबाजी करीत होते, ते भारत माता की जय म्हणायला तयार नसले तरी जय हिंदू म्हणणे त्यांना भाग पडले आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. राष्ट्रवादाच्या मुद्दय़ावर उठवलेल्या वादातील लढाई विचारसरणीच्या माध्यमातून पुढे नेली जाईल, असेही ते म्हणाले.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रविरोधी घोषणाबाजीनंतर जेएनयूला भेट दिली होती, त्याबाबत जेटली म्हणाले, की काही लोक सावरकरांच्या राष्ट्रवादाला आव्हान देत आहेत, पण सावरकरांनी लाखो-करोडो देशवासीयांना राष्ट्रवादाची प्रेरणा दिली होती. राहुल गांधी यांच्यासारखे लोक मात्र देश फोडण्याची भाषा करणाऱ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. हे मोठे आव्हान आहे. विचारसरणीच्या पातळीवर ते आहे, त्यातील पहिली लढाई आम्ही जिंकली आहे. आता लोक भारत माता की जय नाही तरी जय हिंदू म्हणायला तयार आहेत. तोच आमचा विजय आहे. देशाशी एकनिष्ठता दाखवण्यासाठी ते आवश्यक आहे, असे जेटली यांनी दिल्ली भाजपच्या बैठकीत सांगितले.
देशाचे तुकडे करण्याची भाषा बोलली जाते त्याला जर आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणणार असू, तर भारतीय राज्यघटना व कायद्याने त्याला परवानगी दिलेली नाही. पण दुर्दैवाने काही लोक देशाच्या राजधानीत हे करीत आहेत. अनुसूचित जाती जमातीचे लोक, महिला यांच्यापर्यंत जाऊन सरकारची स्टँड अप इंडिया योजना पोहोचवा. या योजनेत प्रत्येक अनुसूचित जाती जमाती व महिला सदस्यांना उद्योग सुरू करण्यासाठी १ कोटी रुपये दिले जाणार आहेत.
जेटली यांनी सांगितले, की काँग्रेसमुक्त भारताची मोदी यांची घोषणा मतदार वास्तवात आणतील, काँग्रेसचा आधार कमी होत चालला आहे. अरुणाचल प्रदेशात काँग्रेस संपली. बिहारमध्ये काँग्रेसने लालू-नितीश यांच्याशी आघाडी केली. तामिळनाडूत ते द्रमुकशी भागीदारी करीत आहेत. काँग्रेसने मुख्य प्रवाहातील पक्षासारखे राजकारण करणे अपेक्षित असताना तो पक्ष काठावर असलेल्या पक्षासारखे वर्तन करीत आहे. आप वर टीका करताना ते म्हणाले, की त्यांची भूमिका सहकार्यापेक्षा संघर्षांची आहे.

‘काँग्रेसचे अवघड ’
उत्तराखंडमध्ये त्यांचे सरकार जाण्याच्या मार्गावर आहे. केरळ व आसाम निवडणुकात भारतीय मतदार मोदी यांचे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न साकार करतील. काँग्रेस सध्या कुठल्याही राजकीय आघाडीत तळाच्या बाजूला आहे, १० व्या किंवा अकराव्या क्रमांकाला खेळायला येण्यासारखे ते आहे.