केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे नेते अरुण जेटली यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, अंत्यदर्शनासाठी जेटली यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात ठेवण्यात आले आहे.

दीर्घ काळापासून आजारी असलेल्या अरुण जेटली यांची नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात शनिवारी दुपारी प्राणज्योत मालवली. जेटली यांचे पार्थिव ‘एम्स’मधून त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले होते. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी 11 वाजता दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजपा मुख्यालयात आणण्यात आले असून, दुपारी 1 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. दुपारी अडीच वाजता यमुना नदीच्या काठावरील निगमबोध घाटावर अरुण जेटली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

‘सुसंस्कृत आणि माध्यम जाणकार’ नेता अशी ओळख असलेल्या जेटली यांनी भाजपमध्येच नव्हे, तर भिन्न राजकीय विचारधारांच्या पलीकडे जाऊन जवळजवळ सर्व पक्षांमध्ये मित्र जोडले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.पेशाने वकील असलेल्या जेटली यांनी मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्रिपद सांभाळले होते. मोदी सरकार आणि भाजप यांचे मुख्य संकटमोचक अशी त्यांची ओळख होती.

जेटली यांनी २०१४ची लोकसभा निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला होता. ते २००० सालापासून राज्यसभेवर होते. भाजप सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पार पाडली. २०१४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येताच त्यांच्याकडे सभागृह नेतेपद देण्यात आले. गंभीर स्वरूपाच्या मधुमेहामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी जेटली यांच्यावर २०१४ मध्ये बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी करण्यात आली होती.