अरुण जेटली यांचे प्रतिपादन

भारत व अमेरिका यांच्यातील संबंध दोन्ही देशांत सरकारे बदलूनही मजबूत व परिपक्व आहेत.  गेल्या दशकभरात ते चांगलेच सुधारले आहेत, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे भारतीय राजदूत नवतेज सरना यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात सांगितले. ते म्हणाले, की दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध आणखी विविध पलूंनी मजबूत करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाशी आमचे सहकार्य राहील. दोन्ही देशांतील संबंधांना पाठबळ असून नवीन प्रशासनही द्विपक्षीय संबंधांना मजबुती देईल अशी अपेक्षा आहे.

जेटली यांनी अमेरिकेचे व्यापारमंत्री विल्बर रॉस यांची भेट घेऊन चर्चा केली. जेटली यांनी त्यांच्याशी चच्रेत असे सांगितले, की या वर्षी आम्ही तीन वर्षांत प्रथमच दोन्ही देशांतील संबंधाबाबत आशावाद जरा जास्त वाढला आहे ही चांगली बातमी आहे. जेटली यांनी एच १ बी व्हिसाबाबत अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने आखलेल्या धोरणांबाबत भारताची चिंता व्यापारमंत्री रॉस यांच्या कानावर घातली. अमेरिकी अर्थव्यवस्थेत भारतीय व्यावसायिकांनी मोठी भूमिका पार पाडल्याची आठवण त्यांनी करून दिली. ट्रम्प यांनी अलीकडेच एका आदेशावर स्वाक्षरी करून एच १ बी व्हिसाबाबतचे धोरण बदलले आहे, त्या निर्णयाचा भारतातील १५० अब्ज डॉलर्सच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगावर होणार आहे. भारतीय कुशल व्यावसायिकांनी अमेरिकेत मोठे योगदान दिले असून अमेरिकी प्रशासन आमच्या चिंता विचारात घेईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. जेटली हे २० एप्रिलला अमेरिकेत आलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत असून, ते सोमवारी जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बठकांना उपस्थित राहणार आहेत.