भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री व प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचं शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाचा त्रास आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. जेटली यांच्या निधनाने देशाचं सर्वांत मोठं नुकसान झाल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्सनी ट्विटरच्या माध्यमातून जेटलींना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता रितेश देशमुख, निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री निम्रत कौर, सनी देओल, शत्रुघ्न सिन्हा, गायक-संगीतकार अदनान सामी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला.

आणखी वाचा : देशातील चर्चित खटल्यांमध्येही होता जेटलींचा सहभाग

भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर जेटली यांनी तब्येतीच्या कारणास्तव मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांनी कायदा आणि जलवाहतूक मंत्रालयाचा कारभार पाहिला होता. २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. २००९ मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी कामही पाहिलं होतं.